तीर्थक्षेत्रांचा विकास कागदावरच !
By Admin | Updated: May 15, 2015 00:49 IST2015-05-15T00:47:14+5:302015-05-15T00:49:39+5:30
उस्मानाबाद : एकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची, तर दुसरीकडे आलेला निधी खर्च होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे.

तीर्थक्षेत्रांचा विकास कागदावरच !
उस्मानाबाद : एकीकडे निधी मिळत नाही म्हणून ओरड करायची, तर दुसरीकडे आलेला निधी खर्च होत नसल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उजेडात आला आहे. ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना किमान पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला गतवर्षी सुमारे ७ कोटींचा निधी मिळाला होता. मात्र, प्रत्यक्षात अवघे २ कोटी १२ लाख रूपये एवढा अत्यल्प निधी खर्च झाला. उर्वरित ४ कोटी ८७ लाख रूपये अखिर्चत राहिल्याने तीर्थक्षेत्रांच्या विकासाला खिळ बसली आहे.
जिल्हा परिषदेची कुठलीही बैठक वा सभा असो. त्यामध्ये विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड सदस्यांतून केली जाते. निधी मिळत नाही, म्हणून सभागृह एक करणारे हे पुढारी निधी खर्चाबाबत मात्र, फारशे गंभीर नसल्याचे दिसून येते. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर झाला होता. या निधीच्या माध्यमातून प्रस्तावित तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भक्तनिवास, पोचरस्ता, परिसर विकास, पाणीपुरवठा आदी सुविधा निर्माण करणे अपेक्षित आहे. असे असतानाही बांधकाम विभागाला अख्ख्या वर्षात सात कोटी रूपये खर्च करता आले नाहीत. वर्षभरात केवळ २ कोटी १२ लाख ३५ हजार रूपये एवढा अत्यल्प निधी खर्च झाला आहे. त्यामुळे सुमारे ४ कोटी ८७ लाख रूपये अखर्चित राहिले आहेत. परिणामी तीर्थक्षेत्रांच्या विकासाला एकप्रकारे खिळ बसल्याचेच यातून समोर आले आहे. त्यामुळे सदरील निधी अखर्चित राहण्यास जबाबदार असणाऱ्यांविरूद्ध कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आता भाविकांतून व्यक्त होवू लागली आहे. कारण निधी मिळूनही संबंधित तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अपेक्षित सुविधा निर्माण होवू शकलेल्या नाहीत. (प्रतिनिधी)