फिजीओथेरपी महाविद्यालय कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:21 IST2021-02-05T04:21:35+5:302021-02-05T04:21:35+5:30
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उभारण्यात येणाऱ्या भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व व्यवसायोपचार महाविद्यालयाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून कागदावरच ...

फिजीओथेरपी महाविद्यालय कागदावरच
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उभारण्यात येणाऱ्या भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व व्यवसायोपचार महाविद्यालयाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून कागदावरच आहे. प्रस्ताव मार्गी लागून महाविद्यालयाची प्रत्यक्षात उभारणीची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.
मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या घाटी रुग्णालयाला केंद्र आणि राज्य सरकारकडून फक्त कागदोपत्री प्रकल्पांचा ‘डोस’ दिला जात आहे. अॅक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी महाविद्यालय उभारण्यात यावे, यासाठी वारंवार प्रस्ताव पाठवण्यात येत होते. परंतु, त्रुटी आणि तांत्रिक कारणांनी हा प्रस्ताव माघारी पाठविण्यात आला. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या निर्णयासाठी ठेवण्यात आला. परंतु, पुढे काहीही होत नसल्याची स्थिती आहे.
शासकीय दंत महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभागादरम्यान असलेल्या जागेवर ३६ कोटींची पाच मजली इमारत उभारणी प्रस्तावित आहे. अॅक्युपेशनल थेरपीचे ३० आणि फिजिओथेरपीचे ३० असे एकूण ६० विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेतील.
विलासराव देशमुख यांनी दिली होती तत्वत: मान्यता
माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांनी २०१० मध्ये भौतिकोपचार (फिजिओथेरपी) व व्यवसायोपचार महाविद्यालयाला तत्वत: मान्यता दिली होती. महाविद्यालयासाठी जागा मंजूर आहे, इमारतही मंजूर आहे. परंतु प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे, असे वरिष्ठ व्यवसाय उपचारतज्ज्ञ डॉ. सतीश मसलेकर यांनी सांगितले. प्रस्तावासाठी पाठपुरावा केला जात आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.