पेट्रोल पंप आज बंद राहणार
By Admin | Updated: August 11, 2014 01:56 IST2014-08-11T01:32:18+5:302014-08-11T01:56:01+5:30
औरंगाबाद : राज्यातील एलबीटी व जकात करामुळे मनपा हद्दीतील वाहनधारकांना पेट्रोल व डिझेल लिटरमागे ५ ते ६ रुपये जादा दराने खरेदी करावे लागत आहेत

पेट्रोल पंप आज बंद राहणार
औरंगाबाद : राज्यातील एलबीटी व जकात करामुळे मनपा हद्दीतील वाहनधारकांना पेट्रोल व डिझेल लिटरमागे ५ ते ६ रुपये जादा दराने खरेदी करावे लागत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, नगरपालिका, नगर परिषद हद्दीत कर वसूल केला जात नसल्याने तिथे तेवढ्याच कमी किमतीत पेट्रोल- डिझेल मिळत आहे. राज्यभर इंधनाचे दर एकसमान ठेवण्यासाठी एलबीटी व जकात हटविण्यात यावी, या मागणीसाठी उद्या सोमवार ११ आॅगस्ट रोजी पेट्रोलपंप बंद राहणार आहेत.
शहरातील सर्व पेट्रोलपंप सोमवारी २४ तास बंद ठेवण्यात येणार आहेत. परिणामी, पेट्रोल खरेदीसाठी रविवारी रात्री वाहनधारकांनी पेट्रोलपंपांवर गर्दी केली होती. अनेक पंपांवर लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. या आंदोलनात राज्यभरातील ४२०० पेट्रोलपंप सहभागी होणार आहेत. यासंदर्भात औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव अकील अब्बास यांनी सांगितले की, मनपा हद्दीपेक्षा नगरपालिका, नगर परिषद हद्दीत पेट्रोल- डिझेल स्वस्त मिळत असल्याने मनपा हद्दीतील पेट्रोलपंपचालकांची ६० टक्के उलाढाल कमी झाली आहे. एलबीटी रद्द करण्यात यावा, यासाठी १० आॅगस्टपर्यंत राज्य सरकारला वेळ दिला होता; पण सरकारने कोणताच निर्णय न घेतल्याने नाइलाजाने आम्हाला पेट्रोलपंप बंद ठेवावे लागत आहेत.