अमित देशमुख यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली
By Admin | Updated: January 13, 2017 00:36 IST2017-01-13T00:35:01+5:302017-01-13T00:36:15+5:30
लातूर : लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित देशमुख यांच्या निवडीला पराभूत उमेदवार अॅड़ अण्णाराव पाटील यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केली होती़

अमित देशमुख यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली
लातूर : लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित देशमुख यांच्या निवडीला पराभूत उमेदवार अॅड़ अण्णाराव पाटील यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केली होती़ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण ही याचिका फेटाळली आहे़
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदार संघातून २ लाख ३ हजार ४५३ वैध मतांपैकी १ लाख १९ हजार ६५३ विक्रमी मते घेऊन अमित देशमुख विजयी झाले होते़ या निवडणुकीत फक्त ४०० मते घेवून अनामत रक्कम जप्त झालेले पराभूत उमेदवार अॅड़ पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आमदार अमित देशमुख यांच्या निवडीला आव्हान दिले होते़ निवडणूक आयोगाने दिलेल्या मर्यादेपेक्षा देशमुख यांनी जास्तीचा खर्च केला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते़ या कारणास्तव आमदारकी रद्द करावी, अशी विनंती याचिकेत केली होती़ याचिकेत मोघम स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ एप्रिल २०१६ रोजी याचिका फेटाळून लावली़ दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला त्यांनी आव्हान देत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ सदरील प्रकरणात आ़ अमित देशमुख यांनी अॅड़ दिलीप तौर यांच्या मार्फत हजर होऊन शपथपत्र दाखल केले़ सदर प्रकरणी १२ जानेवारी २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्या़ गोगई व न्या़ भूषण यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी झाली़ सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवीत याचिका फेटाळली़
याप्रकरणात आ़ अमित देशमुख यांची बाजू अॅड़ केक़े़ वेणुगोपाल व अॅड़ दिलीप तौर यांनी मांडली़ तर याचिकाकर्त्यांची अॅड़ शेखर नाफडे यांनी बाजू मांडली़ आ़देशमुख यांची निवड रद्द करण्यासाठी योग्य ते कारण आणि माहिती सादर करण्यास याचिकाकर्त्यांना शक्य झाले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने याचिका खारीज केली़