प्रमुख पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला

By Admin | Updated: September 18, 2014 00:39 IST2014-09-18T00:17:13+5:302014-09-18T00:39:11+5:30

जालना : जिल्ह्यात कपाशीवर फुलकिडे, सोयाबीनवर चक्रीभुंगा तर मोसंबी व डाळींबावर फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Pests of pests have increased on major crops | प्रमुख पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला

प्रमुख पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला


जालना : जिल्ह्यात कपाशीवर फुलकिडे, सोयाबीनवर चक्रीभुंगा तर मोसंबी व डाळींबावर फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी जोमात आलेले पीक पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.
कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी गेल्या आठवड्यात जिल्ह्यात विविध भागात पिकांची पाहणी केली. अभ्यासाअंती पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात आले. पुणेगाव, पोकळ वडगाव, सोनदेव, पळसखेडा पिंपळे, शेलगाव आदी गावातील भेटींच्या आधारे खालील उपाययोजना सुचविल्या आहेत.
जिल्ह्यात उशिराच्या मान्सूनमुळे कापसाची लागवड जुलैमध्ये झाल्याचे आढळते. सुरूवातीचा कमी पाऊस व उशिरा लागवड, उशिरा दिलेली खते यामुळे पहिल्या दोन महिन्यांत कापसाची वाढ कमी झाल्याचे आढळून आले. नंतर सततचा पाऊस व मिळालेली उघाड व पडलेले ऊन यामुळे कापूस पिकावर फुलकिड्यांचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव जास्त झाल्याचे शास्त्रांचे म्हणणे आहे. ही किड अतिशय लहान व नाजुक असते. ही १ मि.मी. पेक्षा कमी लांब असून रंगाने फिकट पिवळसर असते. फुलकिडे आणि पिले कापसाच्या पानामागील भाग खरडवून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त भागातील पेशी शुष्क होतात. प्रथम तो भाग पांढुरका व नंतर तपकीरी होतो. त्यामुळे पाने, फुले व कळ्या आकसतात व झाडाची वाढ खुंटत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी पुढीलपैकी कुठलेही एक किटकनाशक योग्य प्रमाणात वापरून फवारणी करावी. अ‍ॅसिटामॅप्रीड २० टक्के, २ ग्रॅम किंवा थायोमेथॅक्झॉन २५ टक्के, २.५ ग्रॅम किंवा फिप्रिनिल ५ टक्के २० मि.ली. किंवा मिथील डेमॅटॉन २५ टक्के ८ मि.ली. किंवा अ‍ॅसिफेट ७५ टक्के २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले.
सोयाबीनची पेरणी जुलैमध्ये झाल्यामुळे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. सोयाबीनवर खोड पोखरणारी प्रमुख कीड म्हणून चक्रीभुंग्यामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे. या किडीचा भुंगा फिकट तपकीरी रंगाचा ७ ते १० मि.मी. लांबीचा असतो. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश व अर्धा भाग काळ्या रंगाचे असतात. या किडीची अंडी पिवळसर लांबट आकाराची असून पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. या किडीच्या अळीमुळे पिकांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन खापा करते व खालच्या खापेजवळ अंडी घालण्यासाठी तीन छिद्र पाडते. खोडावर खापा केल्यास दोन ते तीन दिवसाने वरचा भाग सुकण्यास सुरूवात होते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जात असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. किडीच्या नियंत्रणासाठी औषधी फवारणी योग्य प्रमाणात करावी. डायमेथॉएट ३० टक्के १० मी.ली. किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी १६ मि.ली. किंवा लॅम्बडा साहलोथ्रीन ५ टक्के ६ मि.ली. किंवा प्रोफिनोफॉस ५० टक्के २५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.
डाळींब व मोसंबी पिकावर अंबिया बहाराची फळे काढणीस तयार होत आहेत.
हा पतंग रात्रीच्या वेळेस फळातील रस शोषण केल्यानंतर फळे गळून पडतात. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. फळातील रस शोषण करणाऱ्या पतंगाचे (डास) एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन त्यासाठी सुरूवातीला खाली प्रादुर्भावग्रस्त पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. गुळवेल, वासनवेळ यासारख्या तण काढावेत. किटकांचा प्रसार थांबविण्यासाठी बगीचा स्वच्छ ठेवावा, बागेच्या भोवताली सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत धूर करावा, प्रकाश सापळ्याचा वापर करावा व विषाचे अमिष तयार करून झाडाला बांधावेत. मेलॅथियॉन + फळाचा रस याचे द्रवण करून बाटलीमध्ये भरून ही बाटली झाडाला बांधावी. (वार्तहर)

Web Title: Pests of pests have increased on major crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.