चिकाटी, दृढनिश्चिय, सकारात्मकतेमुळेच यश शक्य
By Admin | Updated: August 15, 2014 00:02 IST2014-08-14T23:21:15+5:302014-08-15T00:02:25+5:30
परभणी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हमखास यश मिळतेच, असे लोकेशकुमार जांगिड यांनी ‘सांगितले.

चिकाटी, दृढनिश्चिय, सकारात्मकतेमुळेच यश शक्य
परभणी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी चिकाटी, दृढनिश्चिय व सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तर हमखास यश मिळतेच, असे या परीक्षेत नुकतेच यश मिळविलेल्या परभणी येथील लोकेशकुमार जांगिड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जूनमध्ये जाहीर झाला. या परीक्षेत परभणी येथील रहिवासी असलेल्या लोकेशकुमार रामचंद्र जांगिड यांनी देशपातळीवर ६८ वा रँक मिळविला. लोकेशकुमार यांना यामुळे आयएएसचे कॅडर मिळाले आहे. त्यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली असता त्यांनी त्यांच्या यशाचे गमक सांगितले. लोकेशकुमार यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण परभणी येथील मॉडेल इंग्लिश स्कूल येथे झाले असून ११ व १२ वीचे शिक्षण त्यांनी बालविद्यामंदिर येथून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी नांदेड येथील गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेकचे शिक्षण घेतले. ११ वीपासूनच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवेत जाण्याची इच्छा होती. त्या दृष्टीकोनातून त्यांनी तशी तयारी केली. २००८ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे खाजगी शिकवणी लावून या परीक्षेची तयारी सुरु केली. २००९ मध्ये झालेल्या आयोगाच्या परीक्षेत त्यांनी लोकप्रशासन व समाजशास्त्र हे विषय घेऊन देशपातळीवर ९१० वा रँक मिळविला. त्यामुळे त्यांची दिल्ली- अंदमान निकोबार आयलॅन्ड सिव्हील सर्व्हिसेससाठी निवड झाली. असे असले तरी त्यांचे लक्ष आयएएसकडेच होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा परीक्षेत प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश मिळाले नाही.
अंदमानमध्ये समाजकल्याण संचालक म्हणून नोकरी करीत असताना त्यांनी पुन्हा चौथ्यांदा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यश आले व जूनमध्ये जाहीर झालेल्या निकात त्यांना ६८ रँक मिळाला. त्यामुळे आता त्यांना आयएएस कॅडर मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जुलैमध्ये जांगिड हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ते परभणीत आले असता त्यांनी लोकमत कार्यालयास भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंनी कसलाही न्यूनगंड न बाळगता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करावी. यासाठी चालू घडामोडी, वृत्तपत्राचे वाचन, सखोल अभ्यास, राज्यसभा, लोकसभा टीव्हीवरील बातम्या आणि चर्चासत्र पहावे. बीबीसी वेबसाईडवरील बातम्या व इंटरनेटवर स्पर्धा परीक्षा विषयक असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी. केंद्र शासनाच्या पीआयबी वेबसाईडवरील माहिती घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांच्या ब्लॉगचे वाचन करावे. जेणेकरुन त्यांना प्रेरणा मिळेल. परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन करुन त्यामध्ये सातत्य ठेवावे. चिकाटी असावी. सकरात्मक दृष्टीकोनातून विचार केल्यास निश्चितच यश मिळविता येते, असेही जांगिड म्हणाले.