संशोधक विद्यार्थ्याचा मार्गदर्शकाकडून छळ
By Admin | Updated: July 22, 2014 00:37 IST2014-07-22T00:27:56+5:302014-07-22T00:37:21+5:30
औरंगाबाद : विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एम. फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्याचा मार्गदर्शकाकडून छळ होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

संशोधक विद्यार्थ्याचा मार्गदर्शकाकडून छळ
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एम. फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्याचा मार्गदर्शकाकडून छळ होत असल्याची तक्रार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
दत्तात्रय घोडके हा विद्यार्थी गेल्या १५ महिन्यांपासून विभागातील प्राध्यापकाकडे एम.फिल. करीत आहे. यासाठी दत्तात्रय घोडके या विद्यार्थ्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती जाहीर केलेली आहे. या विद्यार्थ्याची कौटुंबिक परिस्थिती अतिशय हलाखीची असून, तो शहरातील एका आश्रमशाळेत राहून संशोधनाचे कार्य करीत आहे. पण, मार्गदर्शक डॉ. अशोक पवार हे त्याची सतत अडवणूक करतात. संशोधनाऐवजी त्याच्याकडून त्यांची वैयक्तिक कामे करून घेत असतात. आपणास मार्गदर्शक बदलून मिळावा म्हणून या विद्यार्थ्याने फेब्रुवारीपासून कुलगुरू, कुलसचिव व विभागप्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मात्र, त्याच्या निवेदनाची दखल घेतली जात नाही. या त्रस्त विद्यार्थ्याने मार्गदर्शक बदलून न दिल्यास आत्महत्या करण्याचा मनोदय व्यक्त केला असून, त्या आशयाचे निवेदन त्याने आज कुलगुरू कार्यालयात सादर केले आहे.