अर्थसंकल्पाला स्थायीचा हिरवा कंदील
By Admin | Updated: July 8, 2014 00:35 IST2014-07-08T00:05:44+5:302014-07-08T00:35:25+5:30
नांदेड : शहर स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या कारणावरून एटूझेड कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला़

अर्थसंकल्पाला स्थायीचा हिरवा कंदील
नांदेड : शहर स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या कारणावरून एटूझेड कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला़ दरम्यान सन २०१४ चा महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायीने मंजूर केला़ येत्या आठ दिवसात अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर करण्यात येणार आहे़
स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी अर्थसंकल्प मंजुरीसाठी तब्बल तीन तास विशेष सभा घेण्यात आली़ यावेळी अर्थसंकल्पासह इतर विषयावर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले़ मागील काही दिवसांपासून शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या एटूझेड कंपनीच्या तक्रारी वाढल्या होत्या़ ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचल्यामुळे शहरात अस्वच्छ पसरली आहे़
यासंदर्भात मनपाच्या आरोग्य विभागानेही एटूझेड कंपनीच्या कामाबाबत आक्षेप घेवून असमाधान व्यक्त केले होते़ हा विषय स्थायी सभेत चर्चेत आल्यानंतर सदरील कंत्राटदाराकडून हे काम रद्द करण्याची मागणी सदस्यांनी केली़ रमजान महिना होईपर्यंत काम सुरू ठेवून नंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असा ठराव संमत करण्यात आला़ दरम्यान, महापालिकेचा सन २०१४- १५ चा १ हजार ३ कोटी ४९ लाखाचा अर्थसंकल्प स्थायी सभेत मंजूर होवून तो सर्वसाधारण सभेत लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे सभापती उमेश पवळे यांनी सांगितले़
येत्या दोन, तीन दिवसात सदस्यांना उत्पन्नवाढीसाठी सूचना करण्याचे सांगण्यात आले आहे़ बीएसयुपीच्या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अपील कंपनीच्या संदर्भातही सभापती पवळे यांनी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या़ प्रत्येक प्रभागात ५० लाखांचा विकास निधी वाटप करून अविकसित भागासाठी विशेष निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ मालमत्ता करासंदर्भात अप्पर आयुक्त व स्थायी समिती सभापती यांची समिती स्थापन करण्यात आली़
श्री गुरूगोविंंदसिंघजी स्टेडियम हे आतंरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी १ कोटी ४० लाख रूपयांच्या कामास मान्यता देण्यात आली़ हे काम बंगळूर येथील एस़ ग्रीन मास्टर्स स्पोटर्स या कंपनीला देण्यात आले आहे़
सभेच्या प्रारंभी नुतन अप्पर आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे यांचे स्वागत सभापती पवळे यांनी केली़ सभेला सर्व विभाग प्रमुख व सदस्यांची उपस्थिती होती़ तीन तास चाललेल्या सभेत शहरातील ससस्यांवर चर्चा करून त्यावर उपाय सुचविण्यात आले़
(प्रतिनिधी)