निळाईचा जनसागर उसळला

By Admin | Updated: April 14, 2016 01:09 IST2016-04-14T00:50:24+5:302016-04-14T01:09:32+5:30

लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती साजरी करण्यासाठी लातूर नगरी सज्ज झाली आहे

The people of blue are born | निळाईचा जनसागर उसळला

निळाईचा जनसागर उसळला


लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती साजरी करण्यासाठी लातूर नगरी सज्ज झाली आहे. रस्त्यांच्या दुतर्फा निळ्या ध्वजांनी शहर सजले असून, बाबासाहेबांचा जीवनपट उलगडणारे दोनशेवर डिजीटल चित्र शहरभर लावण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी जयंतीच्या पूर्वसंध्येला भीम सैनिकांनी भव्य मोटारसायकल महासमता रॅली काढून बाबासाहेबांना अभिवादन केले. जणू निळाईचा जनसागरच शहरात उसळला होता.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त बुधवारी डॉ. आंबेडकर पार्क येथून भव्य महासमता मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी सारे शहर बाबासाहेबांच्या जयघोषाने दणाणून गेले. निळे ध्वज आणि निळे पट्टे बांधून हजारो भीमसैनिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. लातूर शहरासह ग्रामीण भागातील तरुणांची संख्या या रॅलीत लक्षणीय होती. बुधवारी सकाळी आंबेडकर पार्क येथून महासमता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली आंबेडकर पार्क येथून सकाळी ११ वाजता मार्गस्थ झाली. शहरातील शिवाजी चौक, पाण्याची टाकी, पुन्हा शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, बसवेश्वर चौक, बाभळगाव नाका, गरुड चौक-नांदेड नाका, शाहू चौक, अण्णा भाऊ साठे चौक, गंजगोलाई, सराफ लाईन, गुळमार्केट चौक, गांधी चौक आणि पुन्हा आंबेडकर पार्क या प्रमुख मार्गांवर ही महारॅली मार्गस्थ झाली. शेवटी आंबेडकर पार्क मैदानावर या रॅलीचा दुपारी २ वाजता समारोप झाला.
महारॅलीत हजारोंच्या संख्येने भीमसैनिकांनी आपला सहभाग नोंदविला. या महासमता रॅलीत सहभागी होण्यासाठी पहिल्यांदाच ग्रामीण भागातील हजारो भीमसैनिक लातूर शहरात सकाळी ७ वाजेपासूनच दाखल झाले होते. जयभीम...चा नारा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...च्या घोषणांनी अख्खे शहर दुमदुमून गेले होते. या ऐतिहासिक रॅलीची तयारी महिनाभरापासून सुरू होती.

Web Title: The people of blue are born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.