ग्राहक मंचाने ठोठावला ‘एसबीएच’ शाखेला दंड
By Admin | Updated: October 29, 2014 00:58 IST2014-10-29T00:22:31+5:302014-10-29T00:58:38+5:30
बीड : पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत देण्यात आलेल्या कर्जावर स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेने कर्जदाराकडून अनुदानाच्या रकमेसह व्याज आकारणी केली

ग्राहक मंचाने ठोठावला ‘एसबीएच’ शाखेला दंड
बीड : पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत देण्यात आलेल्या कर्जावर स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेने कर्जदाराकडून अनुदानाच्या रकमेसह व्याज आकारणी केली. या प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेस २५ हजार रुपये दंड व तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी ९ हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे़
बीड येथील के.ए. सानप यांना जिल्हा ग्राम उद्योग मंडळाने पंतप्रधान रोजगार निर्मिती अंतर्गत योजना मंजूर केली होती़ सानप यांना या योजनेर्तंगत ९ लाख रुपये कर्ज मंजूर केले होते. सानप यांनी स्वत: पाच टक्के म्हणजे ४५ हजार रुपये तर उद्योग मंडळाने ३५ टक्के अनुदान रक्कम ३ लाख १५ हजार रुपये असे एकूण ३ लाख ६० हजार रुपये स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या शाखेत जमा केले होते. उर्तवरीत रक्कम ६० टक्के रक्कम ५ लाख ४० हजार रुपये स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेने दिली होती. बँकेने ६० रकमेवर कर्ज आकारणी केली. वारंवार विनंती करुनही ९५ टक्के रकमेवर व्याज लावल्याची तक्रार सानप यांनी ग्राहक मंचात दिली. बँकेने आपली बाजु मांडत सांगितले की, कर्जदार व अनुदानाची ४० टक्के रक्कम जमा झाली होती. ९५ टक्के रकमेवर व्याज घेतले हे अमान्य असून २४ एप्रिल रोजी सानप यांच्या खात्यावर तक्रार प्राप्त होताच १ लाख ५४ हजार रुपये जमा केले होते.
दोन्ही पक्षाचा युक्तीवाद जिल्हा ग्राहक तक्रार निवार मंचाच्या सदस्या मंजूषा चितलांगे, रवींद्र राठोडकर, विनायक लोंढे यांनी ऐकून घेतला. त्यावर सुनावणी करत, बीड शहरातील नगर रोड वरील स्टेट बँक आॅफ हैद्राबादच्या कृषी शाखेस २५ हजार रुपये दंड व तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी ९ हजार रुपये देण्याचे आदेशित केले. तक्रारदार सानप यांच्यावतीने अॅड. अविनाश गंडले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)