पंधराशे कोटींचे मिळणार शेतकर्‍यांना पीक कर्ज

By Admin | Updated: May 8, 2014 00:08 IST2014-05-08T00:08:11+5:302014-05-08T00:08:23+5:30

दिनेश गुळवे , बीड यावर्षीच्या खरीप व रबी हंगामात विविध बॅँकांच्या माध्यमातून पंधराशे कोटी रुपयांचे खरीप व रबी हंगामात पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे.

Peak loans to farmers to get Rs. 15 crores | पंधराशे कोटींचे मिळणार शेतकर्‍यांना पीक कर्ज

पंधराशे कोटींचे मिळणार शेतकर्‍यांना पीक कर्ज

दिनेश गुळवे , बीड यावर्षीच्या खरीप व रबी हंगामात विविध बॅँकांच्या माध्यमातून पंधराशे कोटी रुपयांचे खरीप व रबी हंगामात पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. गतवर्षी रबीचे पीककर्ज पूर्ण वाटप न झाल्याने यावर्षी रबीच्या पीककर्जाचे उद्दिष्ट कमी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना व्यावसायिक बॅँक, सहकारी बॅँक व राष्टÑीयीकृत अशा १७ बॅँकांच्या १९० शाखांमधून पीक कर्ज दिले जाते. शेतकर्‍यांसाठी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत खरीप पिकांसाठी पीककर्ज तर १ आॅक्टोबर ते ३१ मार्च या कालावधीत रबी पिकांसाठी कर्ज देण्यात येते. जूनमध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करतात. या कालावधीत पेरणीसह इतर मशागतीसाठी शेतकर्‍यांकडे पैशाची कमतरता जाणवते. अशावेळी शेतकर्‍यांना आर्थिक मदत म्हणून पीक कर्ज देण्यात येते. विशेष म्हणजे हे पीककर्ज अत्यंत अल्प दराने तर ठराविक रक्कमेपर्यंत शून्य टक्के व्याजाने दिले जाते. यावर्षी एकूण कर्जवाटपाचे उद्दिष्ट २ हजार ४२ कोटींचे आहे. यातील पीककर्ज १५०० कोटींचे आहे. गतवर्षी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ठ १३०० कोटी रुपयांचे होते, यापैकी जवळपास ९१ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. गतवर्षी काही बॅँकांनी उद्दिष्टांपेक्षा अधिक पीककर्ज दिले आहे. तर, काही बॅँकांनी केवळ दहा ते अकरा टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. यावर्षी खरीपसाठी १२६१ कोटी तर रबी पिकांसाठी २२२ कोटींपेक्षा अधिक पीककर्ज वाटप करण्यात येणार आहे. व्यावसायीक बॅँकातून खरीप ६९६.३४ कोटी, रबी- १२२.९० कोटी, महाराष्टÑ ग्रामीण बॅँकेतून खरीप १३९.५३ कोटी, रबी २४.६३ कोटी तर सहकारी बॅँकेतून खरीप ४२५.२७ कोटी व रबी पिकांसाठी ७५.०४ कोटी रुपये पीककर्ज देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतकर्‍यांसमोर आता पेरणीसह इतर मशागतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर यावेळी सर्व शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळावे यासाठी पीक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. ज्या शेतकर्‍यांना पीककर्ज हवे आहे, त्यांना ते मिळते की नाही यासाठी जिल्हा अग्रणी बॅँकेच्या वतीने नियंत्रण केले जात असल्याचे व्यवस्थापक बोकाडे यांनी सांगितले. पीककर्जापासून कोणीही वंचित राहणार नाही यावर्षीच्या पीक कर्जासंदर्भात अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक बोकाडे म्हणाले की, गेल्या काही दिवसात शेतकर्‍यांचे गारपिटीने नुकसान झाल्याने यावर्षी पीक कर्जाची मागणी वाढू शकते. यामुळे मागणी करतील त्या शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळावे यासाठी कर्ज उद्दिष्टांमध्ये वाढ केली आहे. पीककर्जापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचेही ते म्हणाले. वेळीच घ्यावे पीककर्ज विविध बॅँकांमधून पीककर्ज वितरणास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकर्‍यांकडे अगोदरचे कर्ज आहे, त्यांनी ते भरावे व नवीन कर्ज घ्यावे. पीक कर्ज वितरण सुरू झाले असल्याने शेतकर्‍यांनी ते वेळीच घ्यावे, नंतर गर्दी होत असल्याने अनेकांना पीक कर्ज घेण्यात अडचणी येतात. यामुळे शेतकर्‍यांनी वेळीच पीककर्ज घ्यावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रमुख कालिदास आपेट यांनी केले आहे.

Web Title: Peak loans to farmers to get Rs. 15 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.