पैठण लिंक रोडच्या कामात वाटली ९ कोटींची खैरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:39 IST2017-09-03T23:39:14+5:302017-09-03T23:39:14+5:30
पैठण रोड ते ए.एस. क्लबपर्यंत करण्यात आलेल्या ५ कि़मी. लिंक रोडचा भुगा झाला आहे. रोड पूर्णत: ‘इनबॅलन्स’ झाला असून, भरावासाठी टाकलेला मुरूम, खडी जड वाहतुकीच्या रेट्यामुळे उघडी पडली आहे.

पैठण लिंक रोडच्या कामात वाटली ९ कोटींची खैरात
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पैठण रोड ते ए.एस. क्लबपर्यंत करण्यात आलेल्या ५ कि़मी. लिंक रोडचा भुगा झाला आहे. रोड पूर्णत: ‘इनबॅलन्स’ झाला असून, भरावासाठी टाकलेला मुरूम, खडी जड वाहतुकीच्या रेट्यामुळे उघडी पडली आहे. या रोडच्या कामासाठी ९ कोटींची जास्तीची रक्कम देऊनही कंत्राटदाराकडून तो रोड दुरुस्त करून न घेता तो बांधकाम विभागाकडे आहे त्या स्थितीत हस्तांतरित करून राज्य रस्ते विकास महामंडळाने हात वर केले आहेत.
रोडच्या दुरुस्तीसाठी काय करणार, कंत्राटदाराची ईएमडी परत केली की नाही, याबाबत एमएसआरडीसीकडून ठोस असे उत्तर द्यायला कुणीही तयार नाही.
त्या रोडची निविदा १९.१ जास्त दराने मंजूर करण्यात आल्यानंतर पूर्ण काम ३६ कोटींत होणे अपेक्षित असताना राज्य रस्ते विकास महामंडळाने सुमारे ४५ कोटी रुपये इगल कन्स्ट्रक्शन्स या कंत्राटदाराला दिले. ९ कोटी रुपयांची खिरापत देऊनही तो रोड खड्ड्यात गेला आहे. आराखड्याप्रमाणे रोडचे काहीही काम झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.