अपुऱ्या निधीमुळे वेतन रखडले
By Admin | Updated: June 22, 2014 00:25 IST2014-06-22T00:07:37+5:302014-06-22T00:25:45+5:30
औंढा नागनाथ : तालुक्यातील सात केंद्रांतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन अजून मिळालेले नाही.

अपुऱ्या निधीमुळे वेतन रखडले
औंढा नागनाथ : तालुक्यातील सात केंद्रांतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे नाराजी पसरली असून या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये शिक्षकांनी घेतला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा प्रवक्ता इर्शाद पठाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष शाम माने, सचिव शेषराव बांगर, किरण राठोड, विलास सुरवसे, चंद्रकांत सुर्यवंशी, परसराम बर्गे, पृथ्वीराज कदम आदी उपस्थित होते. दोन दिवसांत वेतन न झाल्यास प्राथमिक शिक्षक संघातर्फे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी २ कोटी १६ लाखाच्या निधीची आवश्यकता असताना केवळ १ कोटीची रक्कम मिळाल्याने आठ केंद्रांतर्गत येणाऱ्या शिक्षकांचेच वेतन अदा करण्यात आले. उर्वरित सात केंद्रांचे एप्रिल महिन्याचे वेतन जून संपत आला तरी अद्याप झालेले नाही. त्यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच मे महिन्याच्या वेतनासाठी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर निधीच वितरीत करण्यात आलेला नाही. या संबंधी गटशिक्षणाधिकारी प्रकाश शिकारे यांच्या सोबत शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून एप्रिल व मे महिन्याचे वेतन अदा करण्याची मागणी केली.
औंढा तालुक्याचे शालार्थ प्रणालीचे काम पुर्ण झाले असून केवळ जिल्हास्तरावरून वेतनासाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे वेतन अदा करण्यासंबंधी त्यांनी असमर्थता दर्शविली. जिल्हास्तरावरून निधी प्राप्त होताच तालुक्यातील सात केंद्रांतर्गत येणाऱ्या उर्वरित शिक्षकांचे वेतन तातडीने देण्यात येईल, असे आश्वासनही गटशिक्षणाधिकारी शिकारे यांनी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तालुक्यातील शिक्षकांचे वेतन न झाल्यामुळे मुलांचे शैक्षणिक प्रवेश, बँका- पतसंस्था यांच्या कर्जाचे हप्ते थकल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे. येत्या दोन दिवसांत प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेवून शिक्षकांचे वेतन त्वरीत देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)