पगार द्या; नाही तर कर्मचारी संपावर जाणार
By Admin | Updated: December 16, 2014 01:05 IST2014-12-16T00:42:52+5:302014-12-16T01:05:30+5:30
लातूर : शहर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन थकले आहे़

पगार द्या; नाही तर कर्मचारी संपावर जाणार
लातूर : शहर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून वेतन थकले आहे़ तिसरा महिना संपत आला तरी अद्याप पगार मिळाला नाही़ काम पाहिजे असेल तर अगोदर पगार द्या, नाही तर संपावर जावू असा ईशारा सोमवारी सफाई कर्मचाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे़ १ कोटी ६० लाख रूपये कर्मचाऱ्यांचे वेतन थकित आहे़
लातूर शहर महापालिकेत जवळपास ६६० सफाई कर्मचारी आहेत़ त्यापैकी केवळ ३६० कर्मचारी सफाईचे काम करीत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे़ इतर कर्मचारी विविध विभागात कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी शेकडो कर्मचारी नेमकी कुठे सेवा बजावतात, याचा थांगपत्ता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही अद्याप लागला नाही़ नियुक्ती सफाई कर्मचाऱ्यांची असली तरी अनेक कर्मचारी मनपात ‘साहेबांच्या’ तोऱ्यात वावरतात़ गेल्या महिनाभरापासून मनपा प्रशासनाने सफाईच्या कामाला गती दिली आहे़ काम वाढल्याने काही कर्मचारी नेत्यांनी दोन महिन्यांचे वेतन रखडल्याची बाब पुढे करून आंदोलनाची भूमिका घेतली आहे़ वेतन नसल्याने दोन महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे, किराणा दुकानात सामान उधार मिळत नाही, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नसल्याने घरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ कोणी उधार पैसा द्यायला तयार नाही, अशी माहिती पोटतिडकीने सफाई कर्मचाऱ्यांनी महापौर अख्तर शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांना दिली़ जवळपास दीड तास कर्मचारी महापौर दालनात चर्चा करीत बसले होते़
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रामदास शिंदे, सरचिटणीस कॉ़ राम वडवळे, रिपाइंचे गटनेते चंद्रकांत चिकटे यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)४
राज्य शासनाकडून लातूर शहर महापालिकेला सहाय्यक अनुदान मंजूर झाले आहे़ दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही़ दुसरा हप्ता मिळाल्यावर सर्वांचे वेतन दिले जातील, अशी माहिती मनपा आयुक्त तेलंग यांनी दिली़
४मनपाकडे असलेल्या निधीतून वेतन द्या, अशी मागणी करीत सफाई कर्मचारी आक्रमक झाले़ तीन महिन्यांचे वेतन न दिल्यास संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे़ दोन दिवसांत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली जाईल़ त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़
४महापौर अख्तर शेख म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन थकविले जाणार नाही. निधी प्राप्त होताच वेतन दिले जाईल. शिवाय, मनपाकडून काही आर्थिक तरतूद करता येईल का, याची पाहणी करू.
सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १० तारखेपर्यंत मिळावे, कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर एकत्र बैठक घेऊन मार्ग काढावा़ याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही अद्याप कसलीही कारवाई झाली नाही, वेतनही थकले आहे़ वेतन लवकर न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे़