पावणेदोन लाखांचा ऐवज पळविला
By Admin | Updated: April 16, 2016 00:13 IST2016-04-15T23:50:36+5:302016-04-16T00:13:00+5:30
चाकूर/ चापोली : उकाड्यामुळे कुटुंबातील सर्वजण घराबाहेर आराम करीत असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख ९० हजार रूपये,

पावणेदोन लाखांचा ऐवज पळविला
चापोलीची घटना : गुन्हा दाखल
चाकूर/ चापोली : उकाड्यामुळे कुटुंबातील सर्वजण घराबाहेर आराम करीत असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख ९० हजार रूपये, सोन्या-चांदीचे दागिणे तसेच एक मोबाईल, असा एकूण १ लाख ७४ हजार रूपयांचा ऐवज पळविल्याची घटना गुरूवारी पहाटे चापोली येथे घडली़ या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते़ मात्र माग काढण्यास श्वान पथकास यश आले नाही़
तीव्र उन्हामुळे दिवसभर उकाडा जाणवत आहे़ रात्रीच्यावेळीही उकाड्याचे प्रमाण जास्त आहे़ चापोली येथील राजेसाहेब जानीमियाँ मणियार हे कुटुुंबासोबत बुधवारी रात्री घरासमोरील अंगणात झोपले होते़ तेव्हा अज्ञात चोरट्यांनी घराची कडी उघडून आत प्रवेश केला़ कपाटाची चावी घेऊन कपाट उघडले आणि सोन्याचे नऊ ग्रॅमचे गलसर, एक तोळ्याची बोरमाळ, सात ग्रॅमचे झुमके, साडेसात ग्रॅमचे सोन्याचे गंठण, २२ तोळ्याची चांदीची चैन, पाच तोळ्याचे वाळे, दोन तोळ्याचे कडे, एक मोबाईल आणि रोख ९० हजार रूपये असा एकूण १ लाख ७४ हजार रूपयांचा ऐवज पळविला़ दरम्यान सकाळी मणियार उठून घरात पाहिले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले़ याप्रकरणी मणियार यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलिस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)
घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी नाईक, पोलिस निरीक्षक जावळे यांनी गुरूवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली़ चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते़ मात्र चोरट्यांचा शोध घेण्यास श्वान पथकास यश आले नाही़ याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जी़एस़ बंकवाड करीत आहेत़