पाटोदा ग्रा.पं.ला केंद्र शासनाचा ८ लाखांचा पुरस्कार
By Admin | Updated: August 7, 2014 01:56 IST2014-08-07T01:16:33+5:302014-08-07T01:56:47+5:30
वाळूज महानगर : केंद्र शासनाच्या पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला ८ लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला

पाटोदा ग्रा.पं.ला केंद्र शासनाचा ८ लाखांचा पुरस्कार
वाळूज महानगर : केंद्र शासनाच्या पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला ८ लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १४ आॅगस्टला पुणे येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत राज्यातील ८३३ ग्रामपंचायतींना ‘पर्यावरण विकास रत्न व पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. गावात शुद्ध पाणी पुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन, ग्रामपंचायतीचे संगणकीकृत अद्ययावत अभिलेखे, वृक्ष लागवड, नियमितपणे मासिक व ग्रामसभेचे आयोजन, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. पाटोदा गावात राबविण्यात आलेल्या ‘पाटोदा पॅटर्न’ची सर्व राज्यभर चर्चा आहे. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाची दखल घेऊन केंद्र शासनाचा ८ लाख रुपयांचा मानाचा पुरस्कार या ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. १४ आॅगस्टला पुणे येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार पाटोदा ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मातकर, माजी सरपंच भास्करराव पा. पेरे, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी यांनी ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे कौतुक केले. सरपंच शहाणे, उपसरपंच मातकर, माजी सरपंच भास्करराव पा. पेरे, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी, चंद्रकांत पेरे, बबनराव पेरे, बाळसाहेब पेरे, अप्पासाहेब मुचक, उत्तम पवार, कल्याण पेरे, सखाराम मातकर, बबनराव मुचक, देवचंद पेरे आदींनी आनंदोत्सव साजरा केला.
या ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, यशवंत पंचायत राज अभियान, पर्यावरण विकास रत्न, पर्यावरण संतुलित समृद्ध योजना, निर्मलग्राम, दलित वस्ती सुधार योजना, साने गुरुजी स्वच्छ व सुंदर शाळा, अंगणवाडी इ.सह जवळपास ५० लाखांवर पारितोषिके मिळविली आहेत. पारितोषिकांच्या रकमेचा विनियोग गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी केला जात असल्याचे माजी सरपंच भास्कर पा.पेरे, सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मातकर, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी यांनी सांगितले.