रिक्त पदांचा रुग्णांना ‘ताप’
By Admin | Updated: June 18, 2016 00:41 IST2016-06-18T00:41:22+5:302016-06-18T00:41:22+5:30
बदनापूर : येथील ग्रामीण रुग्णालायात वैद्यकीय अधीक्षकांची जागा सहा महिन्यांपासून व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा वीस दिवसांपासून रिक्त असल्यामुळे

रिक्त पदांचा रुग्णांना ‘ताप’
बदनापूर : येथील ग्रामीण रुग्णालायात वैद्यकीय अधीक्षकांची जागा सहा महिन्यांपासून व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा वीस दिवसांपासून रिक्त असल्यामुळे रुग्णांवर उपचार होईनासे झाले आहेत. या रिक्त पदांचा ‘ताप’ रुग्णांना होत आहे.
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बदनापूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या रिक्त पदांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक गेल्या सहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले, तेव्हापासून हे पद रिक्त आहे. जालना येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे जालना येथील कामकाज असल्यामुळे येथे अद्यापही आले नाहीत. पुर्णवेळ अधिकारी नसल्याने रुग्णालयातील दैनंदिन कामकाज व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यावर विपरीत परिणाम होत आहे. येथील कामकाजावर नियंत्रण नसल्यामुळे हे रुग्णालयच ‘आजारी’ पडले आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम होत आहे. हे रुग्णालय बदनापूरपासून चार किमी अंतरावर असल्यामुळे रुग्णांना ३० ते ४० रू खर्चुन येथे उपचारासाठी यावे लागते. परंतु येथे डॉक्टरच राहत नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खाजगी डॉक्टरांकडे जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याविषयी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडीत म्हणाले की, डॉक्टरांच्या रिक्त जागांबाबत आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्य चिकीत्सकांना अहवाल दिला
आहे. रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील. (वार्ताहर)