संपामुळे रुग्ण अडचणीत
By Admin | Updated: July 3, 2014 00:22 IST2014-07-03T00:01:18+5:302014-07-03T00:22:36+5:30
श्रीक्षेत्र माहूर : येथील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील पाचही आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संपावर असल्याने तालुक्यातील रुग्णांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

संपामुळे रुग्ण अडचणीत
श्रीक्षेत्र माहूर : येथील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील पाचही आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संपावर असल्याने तालुक्यातील रुग्णांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. येथील बसस्थानकात मरण पावलेल्या अनोळखी वृद्धास विना शवविच्छेदन पोलिसांनी दफन केल्याची घटना २ जुलै रोजी घडली.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्या शासनाने मंजूर न केल्याने त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संप, आंदोलन सुरू केले. माहूरचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एस. कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एन. भोसले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, डॉ. निरज कुंभारे, डॉ. एल. डी. नाईक, डॉ. किशन नाईक, डॉ. नसरीन जुबेरी, डॉ. पवार, डॉ. चव्हाण, डॉ. जोगदंड यांनी नांदेड येथे सुरू असलेल्या संताप सहभाग घेतला. येथील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील आष्टा, ईवळेश्वर, वाईबाजार, सिंदखेड, वानोळा या आरोग्य केंद्रातही नागरिक रुग्णांवर साधे प्रथमोपचार न मिळाल्याने रुग्णांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला.
धर्माबादेत रुग्णांना फटका
धर्माबाद : राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्याने धर्माबादेत रुग्णांचे हाल होत आहेत. शासकीय रुग्णालयात उपचार होत नसल्याने रुग्ण खाजगी रुग्णालयाकडे वळले आहेत.
रामतीर्थला परिणाम नाही
शंकरनगर : विविध मागण्यासाठी राज्यभरातील वैद्यकीय अधिकारी १ जुलैपासून संपावर गेले असले तरी रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचे डॉ. भाटापूरकर यांनी सांभाळल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम दिसून येत नाही.
२००९-१० मध्ये सेवेत आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देणे, सेवानिवृत्तीचे वय ६२ करणे, पदवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढणे आदी मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकारी संपावर गेले आहेत. त्यात रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तोटावार यांचाही समावेश आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे रुग्णांची हेळसांड होवू नये म्हणून जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने अत्यावश्यक वैद्यकीय सेवा (१०८) विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना संबंधित रुग्णालयात सेवेसाठी पाठविण्यात आले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोहगाव ता. बिलोली येथील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा (१०८) चे डॉ. श्यामसुंदर बापूराव भाटापूरकर रुजू झाले आहेत. त्यामुळे रुग्णांची सोय झाली. (वार्ताहर)
विना शवविच्छेदन मृतदेहाची विल्हेवाट
माहूर येथील बसस्थानकावर एक ६५ वर्षीय वृद्ध तीन दिवसापासून बेवारस स्थितीत पडून होता. २ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी त्यास ग्रामीण रुग्णालयात आणले असता शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रेतात दूर्गंधी सुटल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय कांबळे, पोलिस निरीक्षक डॉ. जगताप यांनी योग्य ती कार्यवाही करुन प्रेताची दफनविधी केली.