सिल्लोड येथील रुग्णालयातून भरदिवसा नवजात बालिकेस पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:30 IST2018-02-01T00:30:33+5:302018-02-01T00:30:39+5:30
येथील उपजिल्हा रुग्णालयातून भरदिवसा बुरखाधारी महिलेने एक दिवसाची नवजात बालिका पळविल्याची घटना बुधवारी (दि.३१) दुपारी पाच वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे सदर आरोपी महिलेला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सिल्लोड येथील रुग्णालयातून भरदिवसा नवजात बालिकेस पळविले
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयातून भरदिवसा बुरखाधारी महिलेने एक दिवसाची नवजात बालिका पळविल्याची घटना बुधवारी (दि.३१) दुपारी पाच वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे सदर आरोपी महिलेला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील नळणी येथील आसमाबी शेख आसेफ (२६) या महिलेने मंगळवारी (दि.३०) रात्री १ वाजता सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. दरम्यान, बुधवारी (दि.३१) दुपारी आसमाबी आईसह रुग्णालयात बसल्या असता तिथे एक अनोळखी बुरखादारी महिला आली व माझा गर्भपात झाला असल्याचे सांगितले. यावेळी दोघींनीही अनोळखी महिलेला धीर दिला. दरम्यान, आसमाबी व त्यांची आई लघुशंकेसाठी गेल्या असता ही संधी साधून बुरखाधारी महिला नवजात बालिका घेऊन पसार झाली. आसमाबी व त्यांची आई परत आल्या असता त्यांना बालिका दिसून आली नाही. त्यामुळे आरडा-ओरड केली असता मोठी गर्दी झाली. नागरिकांनी आजूबाजूला शोध घेतला असता बालिका आढळून आली नाही. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सपकाळ यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोउनि. बजरंग कुठुंबरे हे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालय परिसर पिंजून काढला. यानंतर शहरातील विविध ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत सिल्लोड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कॅमेरे शोभेची वस्तू
४उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षेकरिता दीड वर्षापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले; मात्र एक वर्षापासून बंद अवस्थेत असलेले कॅमेरे दुरुस्तीची कुणीही तसदी घेतली नाही. कॅमेरे दुरुस्तीबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या; मात्र दखल घेतली नाही, असे वैद्यकीय अधीक्षक सपकाळ यांनी सांगितले.