रुग्णांना उन्हातून, धुळीतून हलविले वार्डात
By Admin | Updated: March 13, 2015 00:39 IST2015-03-13T00:27:27+5:302015-03-13T00:39:24+5:30
संजय कुलकर्णी , जालना शहरातील जिल्हा महिला रुग्णालयात गुरूवारी झालेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरात नियोजनाअभावी एकच गोंधळ उडाला

रुग्णांना उन्हातून, धुळीतून हलविले वार्डात
संजय कुलकर्णी , जालना
शहरातील जिल्हा महिला रुग्णालयात गुरूवारी झालेल्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरात नियोजनाअभावी एकच गोंधळ उडाला. उपाशीपोटी रुग्णांवर तब्बल १८ तासानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना सुरक्षितरित्या नेण्याऐवजी चक्क उन्हातून आणि धुळीतूनच अन्य वार्डात हलविण्यात आले.
या शिबिरात बिनटाक्याचे १५ व टाक्याचे २ अशा एकूण १७ महिला रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बुधवारी दुपारनंतरच रुग्णालयात पाचारण करण्यात आले होते. रूग्णांची तपासणी करून रात्री १० वाजेपर्यंत आहार किंवा चहा घ्यावा, नंतर उपाशीपोटी रहावे, अशा सूचना देण्यात आल्या.
शस्त्रक्रियेपूर्वी सात-आठ तासापर्यंत रुग्णांना चहा, नाश्ता घेण्यास हरकत नाही. परंतु रुग्णांना अठरा तास उपाशी ठेऊन आज दुपारी ४ वाजता या शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला. शिबिरस्थळी कुठेच या कार्यक्रमासंबंधीचे बॅनर दिसून आले नाही.
महिला रुग्णालयात सरकारी डॉक्टरांची संख्या कमी असल्याचे कारण देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका खाजगी डॉक्टरांमार्फत ही शस्त्रक्रिया केली. मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना चक्क उन्हातून व धुळीतून स्ट्रेचरद्वारे अन्य वार्डात हलविण्यात आले. या वार्डातही कचरा होता. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.
रुग्णालयात जागा अपुरी आहे. त्यामुळे आम्ही तडजोड केली. ऊन किंवा धुळीपासून रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता नाही काय? रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी असताना खाजगी डॉक्टरांना का बोलाविण्यात आले? खाजगी डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रियेमुळेच शस्त्रक्रियेस विलंब झाला का? या प्रश्नावर, ६० खाटांचा दवाखाना आहे, मात्र शंभर पेशंट आहेत असे सांगत डॉ. पाटील यांनी मुळ प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी त्यातूनपळवाट शोधण्याचा प्रयत्न केला.
- डॉ. आर.एस. पाटील, वैद्यकीय अधीक्षक
याबाबत एका रुग्णाचे नातेवाईक अब्राहम भालेराव म्हणाले, आमच्या रुग्णास बुधवारी रात्री ९.३० वाजता जेवण देण्यात आले होते. तेव्हापासून शस्त्रक्रियेपर्यंत रुग्णास उपाशीपोटी ठेवावे लागले. शस्त्रक्रियेस विलंब होणार होता तर मग डॉक्टरांनी आम्हाला त्याबाबत माहिती देणे गरजेचे होते.
एक शस्त्रक्रिया असफल
४गेल्या महिनाभरापूर्वी घनसावंगी तालुक्यातील रांजणीवाडी येथील सविता किसन पाटोळे (वय ३५) या महिलेवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र ती असफल ठरली, असा दावा या रुग्णाचे पती किसन पाटोळे यांनी केला. ‘लोकमत’ शी बोलताना पाटोळे म्हणाले, शस्त्रक्रिया असफल ठरल्याने दहा-अकरा दिवसांपासून आम्ही रुग्णालयात दररोज चकरा मारतोय, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळत नाही, असेही ते म्हणाले.