बाजारसावंगीत तापाचे रुग्ण वाढले
By Admin | Updated: August 21, 2014 00:16 IST2014-08-21T00:14:43+5:302014-08-21T00:16:07+5:30
बाजारसावंगी, कनकशीळ, लोणी बोडखा, दरेगाव, पाडळी, ताजनापूर, इंदापूर, धामणगाव आदी गावांत ताप येणे, थंडी वाजणे, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा विविध आजाराने फणफणत आहे.

बाजारसावंगीत तापाचे रुग्ण वाढले
बाजारसावंगी : येथे व परिसरातील खेड्यात ताप येणे, अंग दुखणे, सांधे दुखणे, थंडी वाजणे अशा विविध आजारांची मोठ्या प्रमाणात साथ सुरू असून प्रत्येक घरात एकतरी रुग्ण व्याधीग्रस्त आहे. डेंग्यू असल्याच्या संशयावरून धास्तीने अशा रुग्णांनी शहराकडे धाव घेतली आहे. बाजारसावंगी, कनकशीळ, लोणी बोडखा, दरेगाव, पाडळी, ताजनापूर, इंदापूर, धामणगाव आदी गावांत ताप येणे, थंडी वाजणे, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा विविध आजाराने फणफणत आहे.
विविध आजारांच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याची माहिती प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश घोडके व डॉ. गायकवाड यांनी दिली. व्याधीग्रस्त रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी मोठ्या प्रमाणात खाजगी रुग्णालयात उपचार करणे पसंत केल्याने खाजगी दवाखान्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. गावात, तसेच इतर खेड्यांत घरोघरी जाऊन पिण्याचे पाणी पुरवठा व साठवण केलेल्या पाण्याची तपासणी करण्यात येत असून, साठवण पाण्यात मोठ्या प्रमाणात ‘‘लाखा’ आढळून आल्याने नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. डासांची व चिलटांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती झाल्याने नाली, डबके व इतर ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी सुरू केली असल्याची माहिती सरपंच भीमराव नलावडे, उपसरपंच भावराव काटकर यांनी दिली. पिण्याच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत असून पिण्याचे पाणीपुरवठा करण्याचे हौद स्वच्छ करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी स्वप्नील घरमोडे यांनी दिली.