आरोग्य केंद्रातील रूग्णसेवा सलाईनवर
By Admin | Updated: June 20, 2014 00:44 IST2014-06-19T23:40:02+5:302014-06-20T00:44:33+5:30
कङा: आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतर ठिकाणचाही प्रभार दिल्याने रूग्णालयातील रूग्णसेवा सलाईनवर आली आहे.

आरोग्य केंद्रातील रूग्णसेवा सलाईनवर
कङा: आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना इतर ठिकाणचाही प्रभार दिल्याने रूग्णालयातील रूग्णसेवा सलाईनवर आली आहे. गांभिर्याची बाब म्हणजे येथील रूग्णसेवा सुरळीत केली जावी यासाठी गांधीगिरी आंदोलन केले तर एकदा रूग्णालयास टाळेही ठोकले. यानंतरही येथील रूग्णसेवा सुरळीत होत नसल्याचे रूग्णांचे हाल कायमच आहेत.
सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास ५० हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविली जाते. तसेच या केंद्रांतर्गत सावरगाव, दौलावडगाव, दादेगाव, देऊळगाव घाट, पिंप्री घाटा येथील आरोग्य उपकेंद्राचा कारभारही हाकला जातो. या परिसरातील सुलेमान देवळा हे महत्वाचे रूग्णालय असून येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. बापू चाबुकस्वार हे काम पाहतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे तालुका वैद्यकीय अधिकारी पदाचा प्रभारही देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा अधिकाधिक वेळ आष्टीसह इतर ठिकाणी जातो. यामुळे सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रूग्णांना योग्य सेवा मिळत नाही.
येथे डॉ. कराड यांचीही वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्याकडेही धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचाही बराचसा वेळ धामणगाव येथेच जातो. याचा परिणाम सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णसेवेवर झाला आहे.
येथील रूग्णसेवा सुरळीत व्हावी यासाठी छावा संघटनेने रूग्णालयातील खुर्च्यांना हार घालून गांधीगिरी केली होती. याउपरही रूग्णसेवा सुरळीत होत नसल्याने छावा संघटनेने या प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकले होते. मात्र यानंतरही येथील रूग्णसेवा सुरळीत झालीच नाही. यामुळे रूग्णांचे हाल कायमच आहेत. येथील रूग्णसेवा सुरळीेत करण्याची मागणी छावाचे अशोक वाघुले, दादासाहेब जगताप आदींनी केली आहे.
अनेकदा उद्भवतात साथरोेग
सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावांमध्ये अनेकदा साथरोगांचा उद्रेक होतो. दोन दिवसांपूर्वीच या केंद्रांतर्गत दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रोचे रूग्ण आढळले होते. येथे सातत्याने साथीचे आजार उद्भवत असल्याने वैद्यकीय सेवेत वाढ करण्याची मागणी होत आहे.
लसीकरणावरही परिणाम
सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मुले, गरोदर माता यांना लसीकरण करण्यात येते. येथील आरोग्य केंद्रातील जागा रिक्त असल्याने लसीकरणासाठी आलेल्या रूग्णांनाही तासंतास ताटकळट बसावे लागते.
येथील रूग्ण सेवे संदर्भात डॉ. चाबूकस्वार म्हणाले, आपण शासनाच्या निर्देशानुसार काम करीत आहोत.
रूग्णांना सुरळीत सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच येथील रिक्त जागे संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असून जे कर्मचारी निवासी राहत नाहीत त्यांना नोटीसा दिल्याचेही डॉ. चाबुकस्वार म्हणाले. (वार्ताहर)