रुग्णांचा जीव संकटात..!
By Admin | Updated: January 30, 2015 00:49 IST2015-01-30T00:48:34+5:302015-01-30T00:49:45+5:30
विजय मुंडे ,उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तसंकलनाची क्षमता एक हजार बॅग एवढी आहे़ असे असताना आजघडीला मात्र, या रक्तपेढीत २८ बॅगा असून,

रुग्णांचा जीव संकटात..!
विजय मुंडे ,उस्मानाबाद
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तसंकलनाची क्षमता एक हजार बॅग एवढी आहे़ असे असताना आजघडीला मात्र, या रक्तपेढीत २८ बॅगा असून, त्यात ‘बी प्लस’ गटाच्या अवघ्या दोनच बॅगा आहेत़ शिवाय ‘ओ निगेटीव्ह’ व ‘एबी निगेटीव्ह’ या रक्तगटाची एकही बॅग उपलब्ध नाही़ परिणामी, अत्यवस्थ रुग्णांचा जीव संकटात सापडला आहे़
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये गेल्या काही महिन्यापासून रक्त घटक विलगीकरण केंद्र सुरू झाले आहे़ जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या असलेल्या रुग्णांना या रक्तपेढीतून रक्ताचा पुरवठा केला जातो़ विविध योजनेतील कार्डधारकांना मोफत तर इतरांना ठराविक दरानुसार रक्ताच्या बॅग देण्यात येतात़ या पेढीमध्ये विविध गटाच्या १ हजार बॅगा साठविण्याची क्षमता आहे़ अनेकदा शहर व परिसरातील विविध सामाजिक संघटना तसेच शासकीय रूग्णालयाकडून रक्तसंकलनासाठी शिबिरे आयोजित केली जातात़ रूग्णांना जीवदान मिळावे या हेतूने शहर व परिसरातील २०० दाते स्वयंस्फूर्तीने नियमितपणे रक्तदान करतात़ जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या उस्मानाबाद शहरातील सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात विविध आजारासह अपघातातील गंभीर अवस्थेतील रुग्णांना एरव्ही ‘ओ प्लस’, ‘ओ निगेटीव्ह’ या रक्तगटाची अधिक गरज भासते़ परंतु, सातत्याने या गटाचा तुटवडा रक्तपेढीत जाणवतो़ गत काही दिवसांपासून या रक्तपेढीत ‘बी प्लस’ या गटाचाही तुटवडा जाणवू लागला आहे़ विशेष म्हणजे, रक्तपेढीत सध्या (२९ जानेवारी) ‘एबी निगेटीव्ह’, व ‘बी निगेटीव्ह’ या गटाची एकही बॅग शिल्लक नाही़ तर ‘ए प्लस’च्या १०, ‘ए निगेटीव्ह’ची केवळ एक, ‘बी प्लस’च्या ०२, ‘ओ प्लास’च्या सात, ‘ओ निगेटीव्ह’च्या सहा तर ‘एबी प्लस’च्या दोन बॅगा शिल्लक आहेत़ तर ‘एफएफपी’ ८९, ‘पीसीव्ही’१४ असा साठा आहे़ शहरातील खासगी ब्लडबँक बंद पडल्यामुळे शासकीय रूग्णालयातील रक्तपेढीवर रूग्णांचा भार वाढला आहे़ मात्र, रक्तपेढीतील दररोजचा साठा हा ५० बॅगच्याही आतमध्ये राहत असल्याचे चित्र आहे़
समाजकार्य म्हणून रक्तदान
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मी तीन महिन्याला एकदा रक्तदान करतो, असे पोस्ट कार्यालयातील डाक सहाय्यक रामचंद्र गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ तसेच स्वयंस्फूर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले़
शासनाकडून ऐनवेळी रक्ताची गरज लागली तर सर्वसामान्यांची हेळसांड होवू नये यासाठी १०४ हा ‘टोलफ्री’ क्रमांक सुरू करण्यात आला आहे़ रक्तपेढीपासून ४० किलोमीटर अंतरापर्यंतच्या आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्या रूग्णांसाठी त्यामुळे रक्तपुरवठा शक्य होत आहे़ गत वर्षभरात जिल्ह्यातील २४८ रूग्णांना याचा लाभ मिळाला आला आहे़