‘सीव्हील’मधील रुग्ण वाऱ्यावर!

By Admin | Updated: January 13, 2015 00:12 IST2015-01-13T00:10:17+5:302015-01-13T00:12:43+5:30

उस्मानाबाद : गत महिन्यापासून परिक्षेसह इतर कारणास्तव रजा घेण्याचे जणू सत्रच सुरू केले आहे़ गत महिन्यात १० वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले होते़

The patient in the 'Severe' war! | ‘सीव्हील’मधील रुग्ण वाऱ्यावर!

‘सीव्हील’मधील रुग्ण वाऱ्यावर!



उस्मानाबाद : गत महिन्यापासून परिक्षेसह इतर कारणास्तव रजा घेण्याचे जणू सत्रच सुरू केले आहे़ गत महिन्यात १० वैद्यकीय अधिकारी रजेवर गेले होते़ यातील काही वैद्यकीय अधिकारी रुजू झाले असून, सद्यस्थिती जवळपास सहा वैद्यकीय अधिकारी रजेवर आहेत़ त्वचारूग्णासह इतर विभागात पर्यायी व्यवस्था नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात गोळ्या-औषधे देवून रूग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे़ एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी रजेवर गेल्याने रूग्णालयाचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे़
येथील जिल्हा रूग्णालयात शहरासह तालुका, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रूग्ण उपचारासाठी येतात़ रूग्णालयात आलेल्या रूग्णांची विविध कारणास्तव होणारी हेळसांड ही नित्याचीच बाब बनली आहे़ मयताचे शवविच्छेदन करण्यास होणारा विलंब असो अथवा बाह्य रूग्ण विभागाच्या कालावीत गायब होणारे काही वैद्यकीय अधिकारी असो यामुळे रूग्णांसह नातेवाईकांची हेळसांड होत आहे़
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जयपाल चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या टप्प्यात परिक्षेसाठी जाणाऱ्या व इतर कारणास्तव रजा मागितलेल्या तब्बल १० वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकाचवेळी रजा मंजूर केली होती़
एकाचवेळी दहा वैद्यकीय अधिकारी रजेवर गेल्यानंतर वरिष्ठांना उपलब्ध वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेवून रूग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे़ विशेष म्हणजे त्वचारोग विभागात पर्यायी व्यवस्था नसल्याने गत पंधरा दिवसांपासून येथे उपचारासाठी येणारे रूग्णांची हेळसांड होत आहे़ अंगावरील डाग, पुरळ, खाज सुटणे, चेहऱ्यावरील डाग, गचकरण आदी विविध आजाराचे रूग्ण वैद्यकीय अधिकारी नसल्याने हैराण झाले आहेत़ डॉ़ रणदिवे, डॉ़ कानडे दाम्पत्य, डॉ़ बागल, डॉ़ दापके हे वैद्यकीय अधिकारी गत काही दिवसांपासून रजेवर आहेत़ तर रजेवर गेलेले काही वैद्यकीय अधिकारी गत दोन दिवसापूर्वी रुजू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
जिल्हा रूग्णालयातील सीटीस्कॅन मशीन जवळपास वर्षभरापासून विविध कारणांनी बंद आहे़ चार दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातातील जखमींच्या तपासणी करतानाही येथील यंत्रणेसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या़ जिल्हा रूग्णालयातील इतर अनेक यंत्रणा बंद असून, याचा थेट फटका रूग्णांना बसत आहे़ ही परिस्थिती पाहता सीटीस्कॅनसह इतर यंत्रणा सुरू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे़
त्वचारोग विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था नाही़ मात्र, इतर विभागात उपलब्ध कर्मचाऱ्यांद्वारे रूग्णांची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे़ रजेवर असलेले काही वैद्यकीय अधिकारी रुजू झाले असून, इतरही लवकरच रुजू होणार असल्याचे प्ऱ शल्यचिकित्सक डॉ़ वसंत बाबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

Web Title: The patient in the 'Severe' war!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.