व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या रुग्णाचा चार तासांत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:18+5:302021-07-07T04:06:18+5:30
औरंगाबाद : दारूचे व्यसन सोडविण्यासाठी हर्सूल परिसरातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीचा अवघ्या चार तासांत उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची ...

व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या रुग्णाचा चार तासांत मृत्यू
औरंगाबाद : दारूचे व्यसन सोडविण्यासाठी हर्सूल परिसरातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीचा अवघ्या चार तासांत उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची घटना हर्सूल परिसरातील एका रुग्णालयात घडली. डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची तक्रार करीत नातेवाइकांनी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली. रोहन प्रल्हाद दोहाडे (४०,रा. कुंभेपाडा) असे मृताचे नाव आहे.
याविषयी प्राप्त माहिती अशी की, रोहन यांचे शिक्षण एमएस्सी ॲग्री झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना दारूचे व्यसन जडले होते. यामुळे ते कामधंदा करीत नव्हते. त्यांची व्यसनापासून मुक्तता व्हावी, याकरिता नातेवाईक सतत प्रयत्न करीत होते. ५ जानेवारी रोजी दुपारी नातेवाइकांनी त्यांना हर्सूल रोडवरील राहत व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. याच वेळी त्यांच्या हृदयाचे ठोके कमी झाले. त्यांना कृत्रिम ऑक्सिजनच्या सपोर्टवर ठेवण्यात आले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. रोहनचा मृत्यू झाल्याचे कळताच नातेवाईक रुग्णालयाबाहेर जमले. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने रुग्ण दगावल्याचा आरोप करीत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक मारोती खिल्लारे आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढून प्रेत घाटी रुग्णालयात हलविले. याविषयी हर्सूल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गिरी तपास करीत आहेत.