‘क्रिमपोस्ट’चा पदभार पठाण यांनी स्वीकारला

By Admin | Updated: July 23, 2014 00:20 IST2014-07-22T23:37:23+5:302014-07-23T00:20:06+5:30

हिंगोली : येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा पदभार अखेर यापूर्वी या पदावर नियुक्त झालेले उदगीर येथील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी मंगळवारी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गिरीकडून स्वीकारला.

Pathan took the charge of 'Crimps' | ‘क्रिमपोस्ट’चा पदभार पठाण यांनी स्वीकारला

‘क्रिमपोस्ट’चा पदभार पठाण यांनी स्वीकारला

हिंगोली : येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा पदभार अखेर यापूर्वी या पदावर नियुक्त झालेले उदगीर येथील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी मंगळवारी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गिरी यांच्याकडून स्वीकारला.
हिंगोली येथे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पदावरून गेल्या महिनाभरापासून चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. ‘क्रिमपोस्ट’ असलेल्या या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकाऱ्यांकडून ‘फिल्डिंग’ लावली जाते. यामध्ये काही यशस्वी ठरतात तर काही यशस्वी ठरलेल्यांच्या पदरी अपयशही येते. अशीच काहीशी अवस्था हिंगोली येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पदावरून झालेली आहे. या पदावर आठ महिन्यांपूर्वी रूजू झालेले अभिमन्यू बोधवड यांची गेल्या महिन्यात जालना येथे सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारीपदी बदली झाली होती. त्यांच्या जागी उदगीर येथील उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची नियुक्ती झाली होती. बोधवड यांनी अवेळी झालेल्या बदलीच्या विरोधात महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर धस यांनी बोधवड यांच्या बदलीस स्थगिती दिली होती. तसे आदेशही विभागीय आयुक्तांकडून आले होते. नंतर राज्य पातळीवर हालचाली होऊन बोधवड यांच्या बदलीवरील स्थगिती उठविण्यात आली. त्यामुळे पठाण यांचा मार्ग मोकळा झाला. पठाण पदभार स्वीकारणार असे वाटत असतानाच बोधवड यांनी या बदलीविरोधात ‘मॅट’ मध्ये धाव घेतली. त्यानंतर मॅटने बोधवड यांच्या बदलीला स्थगिती दिली. त्यानंतर बोधवड पुन्हा कामावर रूजू झाले. याच वेळी बोधवड यांच्यावर औंढा येथे तहसीलदारपदी कार्यरत असताना बनावट शिधापत्रिकाद्वारे धान्य उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोेलिसांत गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर वसमत येथील न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला, आणि कळमनुरी पोलिसांनी रात्रीच्या १२ वाजता बोधवड यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना औरंगाबाद येथील खंडपीठाने जामीन मंजूर केल्याचे समजल्यानंतर सोडून देण्यात आले. या प्रकरणातील अन्य तीन आरोपींना मात्र अद्यापही कळमनुरी पोलिसांना अटक करता आलेली नाही, हे विशेष होय.
याप्रकरणी बोधवड यांना विभागीय आयुक्तांनी तातडीने निलंबित केले आणि पुन्हा एकदा पठाण यांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर पठाण यांनी २२ जुलै रोजी प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गिरी यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यामुळे या ‘क्रिमपोस्ट’ साठी पडद्यासमोर आणि पडद्यामागे किती हालचाली झाल्या, याचीच चर्चा जिल्हाभरातून होताना दिसून येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Pathan took the charge of 'Crimps'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.