फसवणूक प्रकरणात पठाण यांना न्यायालयीन कोठडी

By Admin | Updated: December 24, 2016 00:51 IST2016-12-24T00:50:24+5:302016-12-24T00:51:51+5:30

उस्मानाबाद : पोलीस भरती प्रक्रियेत नोकरीचे आमिष दाखवून युवकांना लाखोचा गंडा घातल्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सपोफौ इसूब पठाण यांची शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़

Pathan to be remanded in judicial custody | फसवणूक प्रकरणात पठाण यांना न्यायालयीन कोठडी

फसवणूक प्रकरणात पठाण यांना न्यायालयीन कोठडी

उस्मानाबाद : पोलीस भरती प्रक्रियेत नोकरीचे आमिष दाखवून युवकांना लाखोचा गंडा घातल्या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सपोफौ इसूब पठाण यांची शुक्रवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तर फसवणूक प्रकरणात पठाण यांचे नाव आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी त्यांना निलंबित केले असून, निलंबन कालावधीत मुख्यालयाशी संलग्न केले आहे़
तुळजापूर तालुक्यातील वानेगाव (नळदुर्ग) येथील सद्दाम मैनोद्दीन सय्यद या युवकाने पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान सहा लाखाची फसवणूक झाल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दिली होती़ या फिर्यादीवरून तौफिक खलील शेख याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तर शेख याच्याविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी या प्रकरणात पोलीस दलातीलच कोणाचा सहभाग आहे का, याची तपासणी केली असता पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस फौजदार इसूब पठाण यांचे नाव पुढे आले होते़ इसूब पठाण यांना अटक करून २० डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़
फसवणूक प्रकरणात सपोफौ पठाण यांचे नाव समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्राप्त अहवालानुसार पठाण यांना निलंबीत केले़ तसेच निलंबीत कालावधीत मुख्यालयाशी संलग्न राहण्याचे आदेश दिले़ या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती़ पठाण यांची शुक्रवारी पोलीस कोठडी संपली होती़ त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Pathan to be remanded in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.