‘आयएसओ’च्या परीक्षेत १२४ गणवाड्या उत्तीर्ण
By Admin | Updated: October 29, 2014 00:44 IST2014-10-29T00:35:13+5:302014-10-29T00:44:40+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मिळावे यासाठी सदरील विभागाकडून लोकसहभागाचा आधार घेतला.

‘आयएसओ’च्या परीक्षेत १२४ गणवाड्या उत्तीर्ण
उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मिळावे यासाठी सदरील विभागाकडून लोकसहभागाचा आधार घेतला. याला पहिल्याच प्रयत्नात चांगले यश मिळाले आहे. १४५ पैकी १२४ अंगणवाड्या ‘आयएसओ’ साठी पात्र ठरल्या आहेत. उर्वरित अंगणवाड्यांच्या बाबतीत काही त्रुटी निघाल्या असून, त्याची पूर्तता करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
खाजगी अंगणवाड्यांच्या तोडीस तोड जिल्हा परिषदेच्याही अंगणवाड्या असाव्यात, या उद्देशाने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून उपक्रम हाती घेण्यात आला. अंगणवाडी डिजीटल बनविण्यासाठी लोकसहभाग घेण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास १४५ अंगणवाड्या निवडण्यात आल्या होत्या. या अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून रंगरंगोटी, टी.व्ही. संच, ड्रेस, डेस्क, पाण्याची सोय, खेळाचे साहित्य आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या. यासाठी त्या-त्या अंगणवाड्यांच्या कार्यकर्ती, सेविकांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच या अंगणवाड्या खाजगी अंगणवाडीच्या तोडीस तोड निर्माण झाल्या आहेत.
दरम्यान, सदरील अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ दर्जा मिळावा, यासाठी औरंगाबाद येथील एका संस्थेकडे तपासणीचे काम सोपविले होते. या संस्थेने बालकल्याण विभागाने प्रस्तावित केलेल्या अंगणवाड्यांची तपासणी केली.
या तपासणीमध्ये १२४ अंगणवाड्या ‘आयएसओ’च्या दृष्टीकोनातून निकषपात्र ठरल्या. त्यामुळे आता या अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, उर्वरित अंगणवाड्यांच्या बाबतीत काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित संस्थेने ठराविक कालावधी ठरवून दिला आहे. त्यानंतर संबंधित अंगणवाड्यांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित अंगणवाड्यांपैकी किती अंगणवाड्या ‘आयएसओ’साठी पात्र ठरतात. हे तपासणीनंतर समोर येणार आहे. (प्रतिनिधी)