राष्ट्रीय महामार्गावरही प्रवाशांचा जीव टांगणीला

By Admin | Updated: December 16, 2014 01:04 IST2014-12-16T00:38:22+5:302014-12-16T01:04:41+5:30

उमरगा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरुन धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

Passenger's life on the National Highway | राष्ट्रीय महामार्गावरही प्रवाशांचा जीव टांगणीला

राष्ट्रीय महामार्गावरही प्रवाशांचा जीव टांगणीला



उमरगा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरुन धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धोकादायक वाहतुकीमुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत.
शहरातील मध्य भागातून मुंबई-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो. या राष्ट्रीय महामार्गावरुन पुणे, मुंबई, सोलापूर, विजापूर, हैद्राबाद, गुलबर्गा, हुमनाबाद, निजामाबाद, जहिराबाद या विविध भागात दिवसाकाठी हजारो वाहनांची वर्दळ सुरु असजे. या विविध मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्तीची मालवाहतूक केली जाते. काही मालवाहतूक करणाऱ्या मालट्रकवर भले मोठे मालाचे उंचच्या उंच ढिगारे लोंबकळत असल्याचे दिसून येते. अशा या धोकादायक मालवाहतुकीमुळे समोरुन येणाऱ्या इतर मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना या धोकादायक वाहतुकीचा सामना करावा लागत असून, प्रसंगी होणाऱ्या अपघाताला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गासह गुलबर्गा-लातूर, डिग्गी, बेडगा, गुंजोटी-उमरगा, नारंगवाडी-उमरगा या विविध मार्गावरुन बांधकाम साहित्याच्या मिक्सर, सळई, मोठी अवजारे अशी धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बांधकामासाठी टमटममध्ये पत्रे, लोखंडी पाईप वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या धोकादायक वाहतुकीमुळे सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. मालवाहतूक करणारी वाहने नेमकी कोणाची ती कोठून कुठे चाललीत याची कुणाला पर्वा नसते. अशा या वाहनामुळे वाहतूक करणाऱ्या लोखंडी सळया, लोखंडी पाईप, घर बांधकामाचे पत्रे या साहित्याची असुरक्षित वाहतूक केली जात असल्याने राष्ट्रीय महामार्गावर शहर परिसरातील डिग्गी, बेडगा, गुंजोटी, नारंगवाडी, मातोळा, तुरोरी, दाबका, कवठा, मुळज, तलमोड आदीसह मार्गावरील प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. (वार्ताहर)४
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या वर्दळीमुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होवून अपघात झाले आहेत. झालेल्या अपघातात अनेकांना आपले बळी द्यावे लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरुन होणाऱ्या मालवाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक पोलिसांची नेमणूक नसल्याचे दिसून येत आहे. धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनावरही पोलिसांकडून कारवाई का केली जात नाही असा प्रश्न प्रवाशी व नागरिकांतून केला जात आहे. शहर व परिसरातील अवैध वाहतूक, नियमबाह्य व धोकादायक वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांची स्वतंत्र शाखा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Passenger's life on the National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.