प्रवाशांची परवड सुरुच
By Admin | Updated: September 30, 2014 01:26 IST2014-09-30T00:06:23+5:302014-09-30T01:26:38+5:30
उदगीर : बीदर गेटवरील उड्डाण पुलाच्या कामामुळे एसटीने प्रवाश्यांच्या खिश्याला मोठीच कात्री लावली आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने शेल्हाळ मार्ग खुला करुन

प्रवाशांची परवड सुरुच
उदगीर : बीदर गेटवरील उड्डाण पुलाच्या कामामुळे एसटीने प्रवाश्यांच्या खिश्याला मोठीच कात्री लावली आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने शेल्हाळ मार्ग खुला करुन दिला असला तरी एसटीने आकारलेले अतिरिक्त दर खड्ड्यांच्या नावाखाली मागे घेण्यासाठी टाळाटाळ लावली आहे़ दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागानेही या रस्त्याचे काम करण्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाश्यांची मात्र हकनाक परवड सुरु आहे़
बीदर गेटवरील घाईगडबडीत सुरु केलेले उड्डाणपुलाचे काम प्रवाश्यांच्या मुळावर उठले आहे़ बीदर रस्त्याने एसटीद्वारे दररोज प्रवास करणाऱ्या जवळपास सात हजाराहून अधिक प्रवाश्यांकडून ६ रुपयांपर्यंत अतिरिक्त तिकिट आकारले जात आहे़ प्रारंभी सार्वजनिक बांधकाम विभागाने एसटीला पर्यायी मार्ग म्हणून वळण रस्ता उपलब्ध करुन दिला होता़ त्यामुळे हे दर वाढविण्यात आले़ दरम्यान, बांधकाम विभागाने चार दिवसांपूर्वीच जवळचा येल्हाळ मार्ग एसटीला खुला करुन दिला़ मात्र हा रस्ता अरुंद व खड्डेमय आहे़ त्यामुळे एसटीला ये-जा करणे पुरेसे सोयीचे नाही़ त्याअनुषंगाने उदगीर आगाराने या रस्त्याची दुरुस्ती करुन देण्याची मागणी करणारे पत्र बांधकाम विभागाला दिले़ परंतु, बांधकाम विभागाने या रस्त्याकडे अद्याप ढुंकूनही पाहिले नाही़ त्यामुळे एसटीने एवढ्या एकाच कारणावरुन दरवाढ मागे घेण्यात कुचराईपणा सुरु केला आहे़ हा रस्ता सोयीचा नसल्याचे कारण सांगून एसटीने आपले अतिरिक्त तिकिट वसूल करणे सुरुच ठेवले आहे़ हे अतिरिक्त तिकिट वळण रस्त्याने एसटी गेल्यास आकारणी होणारे आहे़ परंतु, निलंगा आगाराच्या जवळपास सर्वच एसटी खड्डे असलेल्या येल्हाळ रस्त्यानेच ये-जा करीत आहेत़ उदगीर आगाराच्या एसटीही त्यात मागे नाहीत़ कर्नाटक व आंध्रप्रदेशच्या गाड्या तर सुरुवातीपासूनच शेल्हाळ मार्गाने ये-जा करीत आहेत़ वास्तवात या मार्गाने एसटी नेल्यास किती रुपये अतिरिक्त तिकिट लावावे, याची चाचपणी व त्यावर अंतिम मोहोर अद्यापही लागलेली नाही़
सुरुवातीला शेल्हाळ मार्ग मिळाल्यास एक रुपयाही वाढ होण्याची शक्यता नसल्याचे एसटीचेच अधिकारी सांगत होते़ मात्र आता या मार्गाने एसटींची ये-जा सुरु असतानाही सरसकट अतिरिक्त दर आकारुन प्रवाश्यांची लुबाडणूक सुरुच आहे़ सार्वजनिक बांधकाम विभाग व एसटीच्या वाद-प्रतिवादात प्रवासी मात्र हकनाक भरडला जात आहे़ (वार्ताहर)