प्रवासी महिलेचे १८ तोळे सोने लंपास
By Admin | Updated: May 15, 2015 00:49 IST2015-05-15T00:45:27+5:302015-05-15T00:49:12+5:30
उमरगा : येथील बसस्थानकातून एका प्रवाशी महिलेच्या पिशवीतील १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ५५ हजारांची रोकड असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला़

प्रवासी महिलेचे १८ तोळे सोने लंपास
उमरगा : येथील बसस्थानकातून एका प्रवाशी महिलेच्या पिशवीतील १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ५५ हजारांची रोकड असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला़ ही घटना गुरुवारी सकाळी उमरगा येथील बसस्थानकात घडली असून, चोरट्यांच्या तपासासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहेत़
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गुलबर्गा येथील ताराबाई बाबूराव चव्हाण या बलसूर येथे नातलगांसह देवकार्याच्या कार्यक्रमाला आल्या होत्या़ देवकार्य झाल्यानंतर ताराबाई चव्हाण या गुरूवारी सकाळी गुलबर्गाकडे जाण्यासाठी उमरगा येथील बसस्थानकात आल्या होत्या़ बसमध्ये चढत असताना त्यांच्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी १८ तोळे सोने, रोख ५० हजार रुपये लंपास केले़ चोरी झाल्याचे समोर आल्यानंतर ताराबाई चव्हाण यांनी थेट उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेतली़ पिशवीतील सोन्याचे लॉकेट, मंगळसूत्र, आंगठ्या, ब्रेसलेट, झुके आदी साहित्य लंपास केले़ ताराबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास पोउपनि एम़एस़लोंढे हे करीत आहेत़ चोरट्यांच्या शोधार्थ विविध पथके रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़ (वार्ताहर)