पाच लाखांवर समाजबांधव होणार सहभागी
By Admin | Updated: October 12, 2016 23:07 IST2016-10-12T22:21:44+5:302016-10-12T23:07:18+5:30
बीड : अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्तांच्या न्याय- हक्कासाठी १५ आॅक्टोबर रोजी येथे निघणाऱ्या दलित ऐक्य मूकमोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे.

पाच लाखांवर समाजबांधव होणार सहभागी
बीड : अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्तांच्या न्याय- हक्कासाठी १५ आॅक्टोबर रोजी येथे निघणाऱ्या दलित ऐक्य मूकमोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. या मोर्चाची संपूर्ण राज्यात चर्चा असून पाच लाखांवर बांधव सहभागी होतील, असा विश्वास संयोजन समितीच्या वतीने बाबूराव पोटभरे, पप्पू कागदे, अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केला.
बुधवारी येथे शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेस मनीषा तोकले, अरुणा आठवले, सुभाष गायकवाड, विजय साळवे, डॉ. लक्ष्मण जाधव, अजय सवाई, बाळासाहेब गुंजाळ, संतोष गायकवाड, माणिक वाघमारे, भुलेनाथ मुने, रामसिंग टाक, सुनील बळवंते, सूर्यकांत पवार, गणेश वाघमारे, राजेश घोडे, राजू जोगदंड उपस्थित होते.
मोर्चाच्या अनुषंगाने महिनाभरापासून तयारी सुरु आहे. तालुकानिहाय तसेच वाड्या, वाड्या व तांड्यांवर जाऊन बैठका घेण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त समाजातील बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हा मोर्चा कुठल्या जातीविरोधात नसून अस्तित्वासाठी असल्याचे कागदे, पोटभरे यांनी स्पष्ट केले.
विविध पक्ष, संघटनेचे नेते व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होत असले तरी नेतृत्व सर्वसामान्य महाविद्यालयीन विद्यार्थिनी व महिला करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूलापासून मोर्चाला प्रारंभ होईल. माळीवेस, धोंडीपुरा, बशीरगंज मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत मोर्चा निघणार आहे. पाच हजार स्वयंसेवक दिमतीला राहणार आहेत. मोर्चाच्या शेवटच्या टोकाला साफसफाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)