पावणेचार दलघमी पाण्याची चोरी
By Admin | Updated: August 17, 2014 00:55 IST2014-08-17T00:49:29+5:302014-08-17T00:55:04+5:30
नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील पाण्याचा उपसा नियंत्रणासाठी दक्षता पथक स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत़

पावणेचार दलघमी पाण्याची चोरी
नांदेड : विष्णूपुरी जलाशयातील पिण्यासाठी आरक्षित असलेल्या साठ्यापैकी ३़७६ दलघमी एवढ्या पाण्याचा सिंचनासाठी अनधिकृतपणे उपसा झाल्याची बाब प्रभारी आयुक्त डॉ़निशिकांत देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर हा उपसा तत्काळ बंद करुन त्यावर नियंत्रणासाठी दक्षता पथक स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत़
नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी एकमेव स्त्रोत असलेल्या विष्णूपुरी जलाशयातील पाणी हे फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे़ सद्य:स्थितीत अत्यंत कमी म्हणजे केवळ १७़०९ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे़ त्यामुळे तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे़ याबाबत शासनाने मागील महिन्यातच सर्व प्रकारच्या शासकीय स्त्रोतातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करुन सर्व प्रकारच्या पाण्याचा उपसा तत्काळ बंद करण्याचे निर्देश दिले होते़
विद्यमान आणि संभाव्य टंचाईची वाढती तीव्रता लक्षात घेता २७ जुलै रोजी दिग्रस बंधाऱ्यातील ८़६८ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्याच्या वापरासाठी विष्णूपुरी जलाशयात सोडण्यात आले होते़
परंतु पिण्यासाठी आरक्षित केलेल्या साठ्यापैकी ३़७६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा अनधिकृतपणे सिंचनासाठी उपसा केल्याचे उघडकीस आले़
ही बाब आयुक्तांनी ४ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून निदर्शनास आणून दिली़ त्याची दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपाचे अभियंता, महावितरण अभियंता यांना एका लेखी पत्राद्वारे विष्णूपुरी जलाशयातील अनधिकृत उपसा रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलून कारवाईच्या सूचना दिल्या़
मनपा आयुक्तांनी दक्षता पथक गठीत करुन अनधिकृत पाणी उपशावर नियंत्रण ठेवावे असेही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)