परळीत बाजार समितीच्या सचिवपदाचा वाद कायम
By Admin | Updated: May 22, 2015 00:35 IST2015-05-22T00:11:41+5:302015-05-22T00:35:13+5:30
परळी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदावरून सुरू असलेला वाद गुरूवारी देखील शमला नाही. सचिवपदाच्या कक्षाला सील

परळीत बाजार समितीच्या सचिवपदाचा वाद कायम
परळी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदावरून सुरू असलेला वाद गुरूवारी देखील शमला नाही. सचिवपदाच्या कक्षाला सील लावल्यामुळे नवाच वाद उभा राहिला. नित्याप्रमाणे कार्यालयात आलेल्या वंदना पवार यांना सील पाहून परतावे लागले.
वंदना पवार यांनी तीन संचालकांविरूद्ध १२ मे रोजी शहर ठाण्यात खंडणी, अॅट्रॉसिटीअन्वये गुन्हा नोंद केल्यापासून ठिणगी पडली आहे. १३ मे रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत पवार यांच्यावर १४ आरोप ठेवून निलंबित करण्याचा ठराव घेतला होता. त्यानंतर सचिवपदाचा प्रभारी कार्यभार माजलगाव येथील कृ. उ. बा. चे सचिव डी. बी. फुके यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
दरम्यान, गुरूवारी वंदना पवार सकाळी दहा वाजता बाजार समितीच्या कार्यालयात आल्या. सचिवांच्या कक्षाला सील असल्याचे पाहून त्या बाहेर पडल्या. लातूर कार्यालयातील सहसचिवांकडे दाद मागून परळी कृ. उ. बा. च्या निर्णयाला स्थगिती मिळविलेली आहे, असे त्या म्हणाल्या.
प्रभारी सचिव फुके म्हणाले, पवार यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. २५ मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर संचालक मंडळ त्यांच्याबाबतीत निर्णय घेईल. अधिक सांगता येणार नाही. (वार्ताहर)