परळी शोकमग्न

By Admin | Updated: October 14, 2016 00:24 IST2016-10-14T00:23:19+5:302016-10-14T00:24:52+5:30

परळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडितराव (अण्णा) मुंडे (वय ७५) यांच्या निधनाने गुरुवारी परळी शोकमग्न झाली.

Parley shudder | परळी शोकमग्न

परळी शोकमग्न

संजय खाकरे परळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडितराव (अण्णा) मुंडे (वय ७५) यांच्या निधनाने गुरुवारी परळी शोकमग्न झाली. सायंकाळी सात वाजता हृदयविकाराच्या धक्क्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरपंच ते जि.प. अध्यक्ष ही त्यांची संघर्षमय राजकीय कारकीर्द जिल्हावासियांनी पाहिली आहे.
दिवगंत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांचे जेष्ठ बंधू व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांची जिल्ह्याच्या राजकारणावर छाप होती. नाथ्रा गावच्या सरपंचपदापासून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. १९९७ ते मार्च १९९८ व मार्च २००२ ते फेब्रुवारी २००५ या कालावधीत सलग दोन वेळा त्यांना जि. प. च्या अध्यक्षपदाच्या रुपाने लाल दिव्याचा बहुमान मिळाला होता. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची धुरा त्यांच्याकडे होती. संत जगमित्र नागा सहकारी सूतगिरणीचे चेअरमनपदही त्यांनी भूषविले.
त्यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. परळीमध्ये अवघ्या दोन मिनिटात मुख्य बाजारपेठेतील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली. तालुक्यातील व जिल्हाभरातील त्यांच्या समर्थकांनी परळीकडे धाव घेतली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खासगी दवाखाना परिसरात मोठी गर्दी झाली होती.
शुक्रवारी दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने जिल्हा जेष्ठ नेत्याला मुकला, अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत.
गोपीनाथराव मुंडे यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर पंडितअण्णा मुंडे यांनी २०१२ मध्ये राकाँच्या तिकीटावर सिरसाळा जि. प. गटातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते प्रकृती स्वस्थामुळे सक्रिय राजकारणापासून दूर झाले. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद स्वीकारले. सहकार क्षेत्रातही त्यांनी कारकीर्द गाजवली. वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत ते पुत्र धनंजय यांच्यासाठी प्रचारात उतरले होते.
दसऱ्यादिवशी दिले आशीर्वाद...
विजयादशमी दिवशी चाहत्यांनी आशीर्वादासाठी पंढरी निवास या त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. यावेळी खुर्चीत बसून त्यांनी आलेल्या प्रत्येकाला सोने म्हणून आपट्याची पाने देत आशीर्वाद दिले होते. त्यांच्या सोबत कार्यरत असलेल्या सहकारी पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवादही साधला होता. प्रत्येकाची आवर्जून विचारपूस करणारे पंडितअण्णा मुंडे दोन दिवसानंतरच सोडून गेले, त्यांच्या आठवणींनी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले.
पंढरी निवासी हुंदके अन् अश्रू...
पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनानंतर अंबाजोगाई रस्त्यावरील पंढरी निवास या त्यांच्या निवासस्थानी देखील नातेवाईक व समर्थकांची रीघ लागली होती. कुटुंबीय शोकमग्न झाले होते. पंडितअण्णा यांच्या निधनाने पोरके झाल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. अश्रू अन् हुंदक्यांनी पंढरी निवास परिसर शोकसागरात बुडाला होता. शुक्रवारी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

Web Title: Parley shudder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.