शहरात पार्किंगची समस्या; वाहन खरेदी करावे की नाही?
By Admin | Updated: December 1, 2014 01:26 IST2014-12-01T01:12:09+5:302014-12-01T01:26:25+5:30
औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे,

शहरात पार्किंगची समस्या; वाहन खरेदी करावे की नाही?
औरंगाबाद : शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने तसेच अनेक दुकानदारांनीच अतिक्रमणे करून आपली दुकाने रस्त्यावर थाटल्याने वाहन कुठे लावावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन घेऊनही या शहरात फारसा उपयोग नाही, अशी नागरिकांची मनोभूमिका बनत चालली असल्याचे दिसते.
जुन्या शहरात गुलमंडी, औरंगपुरा, सिटी चौक, सराफा, शाहगंज, रोशनगेट, चेलिपुरा, बुढीलेन, दलालवाडी या परिसरात सकाळी व सायंकाळी नागरिकांची मोठी गर्दी असते. शहराच्या इतर भागांतून सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक खरेदीसाठी या भागात येतात. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची गर्दी असते. विशेष करून शनिवारी आणि रविवारी अधिक गर्दी असते.
पैठणगेट ते गुलमंडी आणि गुलमंडी ते औरंगपुरा या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही या ठिकाणी वाहतूक खोळंबते. गुलमंडीवर दुचाकी वाहनांसाठी वाहनतळ आहे, तर पैठणगेट येथे चारचाकी वाहनांसाठी तळ आहे. मात्र, पैठणगेट येथे वाहन लावून गुलमंडीपर्यंत पायी जाणे अनेक नागरिक टाळतात. शिवाय औरंगपुरा, निराला बाजार या भागांकडून येणाऱ्या चारचाकीधारकांना कोठे वाहन लावायचे, हा प्रश्न सतावत असतो. सिटी चौक भागात तर दुचाकी वाहन लावायलाही जागा नसते. हीच अवस्था शाहगंज आणि बुढीलेन भागात आहे.
शहरातील उस्मानपुरा चौक ते श्रेयनगर आणि उस्मानपुरा चौक ते पीरबाजार या भागातही वाहनतळ नसल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहने आढळतात. आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक व पुढे गजानन महाराज मंदिर तसेच समर्थनगर परिसर या भागातही वाहने लावायला जागा नाही, अशी अवस्था आहे.
जालना रस्त्यावर चारचाकी वाहन लावायला जागा नसल्याची परिस्थिती रोजच असते. जालना रस्त्यावर अनेक इमारतींच्या पुढे अतिक्रमण झाले असल्याने तसेच महापालिकेचे एकही वाहनतळ नसल्याने अनेक इमारतींच्या समोर रस्त्यावर वाहने दिसतात. परिणामी, या रस्त्यावरूनही वाहन चालविणे नागरिकांना धोकादायक वाटते.