पार्किंगचा पास फक्त महिन्याच्या सुरुवातीलाच
By Admin | Updated: September 28, 2014 00:18 IST2014-09-28T00:18:10+5:302014-09-28T00:18:10+5:30
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील पार्किंगच्या दरात आधी दुपटीने वाढ करण्यात आली.

पार्किंगचा पास फक्त महिन्याच्या सुरुवातीलाच
औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील पार्किंगच्या दरात आधी दुपटीने वाढ करण्यात आली. त्यानंतर आता पार्किंगचा मासिक पास काढायचा तर एक तारखेलाच येण्याचे पार्किंगचालकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे दररोज तिकिटाच्या खर्चापेक्षा वाहनाच्या पार्किंगसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मागणीप्रमाणे मासिक पास न देता मनमानी पद्धतीने पैसे वसूल केले जात असल्याचे अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.
औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून रोज हजारो प्रवासी जालना, लासूरसह विविध ठिकाणांहून नोकरी, शिक्षणानिमित्त ये-जा करतात. आधीच रोजचा प्रवास महागल्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात गेल्या काही महिन्यांपासून वाहनाच्या पार्किंगसाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेस्थानकावरील पार्किंगमध्ये वाहन उभे करण्यासाठी दुचाकीसाठी सहा तासांसाठी १०, तर बारा तासांसाठी २० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. नोकरी, शिक्षणानिमित्त अपडाऊन करणारे प्रवासी स्थानकातील पार्किंगमध्ये वाहन उभे करतात. सहा तासांच्या आत परत येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना दररोज पार्किंगसाठी २० रुपये खर्च करावे लागत आहेत. दररोज २० रुपये याप्रमाणे महिन्याला किमान ६०० रुपये पार्किंगसाठी मोजावे लागत आहेत, तर पार्किंगचा महिन्याचा पास हा ४०० रुपयांचा आहे. महिन्याच्या ७ ते १५ तारखेपर्यंत वेतन होते; परंतु महिन्याच्या ३ तारखेनंतर मासिक पास दिला जात नाही. त्यामुळे पार्किंगसाठी जास्त पैसे मोजण्याची वेळ येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. पार्किंगच्या दरात झालेली वाढ मागे घेण्याबरोबर कोणत्याही तारखेला मासिक पास दिला पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.