जिल्हा कचेरीत पार्किंगचा फज्जा

By Admin | Updated: July 8, 2014 00:56 IST2014-07-07T23:15:47+5:302014-07-08T00:56:40+5:30

बीड: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातून येणारे नागरिक व काही कर्मचारी आपले वाहन कोठेही उभे करतात.

Parking guard of the district office | जिल्हा कचेरीत पार्किंगचा फज्जा

जिल्हा कचेरीत पार्किंगचा फज्जा

बीड: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाभरातून येणारे नागरिक व काही कर्मचारी आपले वाहन कोठेही उभे करतात. यामुळे जिल्हा कचेरीच्या आवाराला बाजार तळाचे स्वरूप आले आहे. पार्र्कींग व्यवस्थेसाठी येथे पोलीस असतात. मात्र ते ही मूग गिळून गप्प बसत असल्याने जिल्हा कचेरीत ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असे वातावरण आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील मुख्य कार्यालय आहे. येथे जिल्ह्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय विभागातील कामांसाठी नागरिक येत असतात. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांची संख्या दररोज हजारांवर असते. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा कचेरीत अत्याधुनिक इमारती बांधल्या असून समोर गार्डनही केले आहे. या आवारात केलेल्या कामांमुळे जिल्हा कचेरीला नवा ‘लूक’ मिळालेला आहे. येथून नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न होतो. तसेच नागरिकांची कामे मार्गी लावण्यासाठीही येथूनच कार्यवाही केली जाते. आपली कामे तात्काळ व्हावीत, आपल्यावरील झालेला अन्याय दूर व्हावा यासाठी येथे महिला, पुरूषांची मोठ्या प्रमाणावर दररोज वर्दळ असते.
येथे नागरिक दुचाकीसह चारचाकी गाड्या घेऊन येतात. गांभिर्याची बाब म्हणजे जिल्हा कचेरीतच अनेकदा ट्रिपल सिट गाड्याही सुसाट हाकल्या जातात. येथे संरक्षणासाठी असलेले पोलीसही याकडे कानाडोळा करतात.
सामान्य माणसांनी येथे दुचाकी आणल्यास त्यांना कधी-कधी हटकले जाते. मात्र काही पुढारी व त्यांचे ‘बगलबच्चे’ आपल्या गाड्या सुसाट हाकत थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्य कार्यालयासमोरच उभ्या करतात. अशावेळी सामान्य नागरिकांना कायद्याचे धडे देणारे पोलीसही गप्प बसतात. सामान्यांना एक न्याय व पुढाऱ्यांच्या गाड्यांना एक न्याय असा जिल्हा कचेरीत दुजाभाव का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अशोक डोईफोडे यांनी केला आहे. जिल्हा कचेरीत दुचाकी लावण्यासह चारचाकी लावण्यासाठी विशिष्ट पार्किंग केलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच पोलीस बसलेले असतात. मात्र हे पोलीसही कोठेही गाडी थांबविणाऱ्यांना मज्जाव करत नाहीत. जिल्हा कचेरीत सेतू कार्यालय आहे. या कार्यालयासमोर पार्किंगची जागा नाही. गंभीर बाब म्हणजे गाड्यांवर पोलीस असे नाव असलेल्या गाड्याच येथे उभ्या असल्याचे चित्र पहावयास मिळते. जिल्हा कचेरीत अलिकडेच नवीन प्रशासकीय इमारत बांधलेली आहे. या इमारतीसमोरही अनेकदा दुचाकी व चारचाकी गाड्या अनधिकृतपणे उभ्या असतात. तर आश्चर्याची बाब म्हणजे दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांच्याच मुख्य कार्यालयालगतही अनधिकृत गाड्या उभ्या असलेल्या सर्रास पहावयास मिळतात. या कार्यालयात जागोजागी उभ्या असलेल्या अशा गाड्यांमुळे जिल्हा कचेरीला बाजार तळाचे स्वरूप आले आहे. येथे गाड्यांना शिस्त लावण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)
‘त्यांच्या’ गार्डने गाड्या जाऊ देऊ नयेत
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलीसांचा बंदोबस्त असतो. येथे बंदोबस्तासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे किंवा मुख्यालयातील पोलीस असतात. पोलीस असतानाही येथील पार्किंगचा फज्जा उडाल्या संदर्भात शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात ‘त्यांचा’ गार्ड असतो. त्याने अशा कोठेही गाड्या पार्क केल्या जाऊ देऊ नयेत.

Web Title: Parking guard of the district office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.