पार्किंगच्या फायली महापालिकेतून गायब
By Admin | Updated: July 18, 2016 01:12 IST2016-07-18T00:41:00+5:302016-07-18T01:12:42+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या नगररचना विभागात मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अलीकडेच बदल्या करण्यात आल्या.

पार्किंगच्या फायली महापालिकेतून गायब
औरंगाबाद : महापालिकेच्या नगररचना विभागात मागील अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अलीकडेच बदल्या करण्यात आल्या. बदल्या करण्यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी अनेक इमारतींशी संबंधित पार्किंगच्या अत्यंत महत्त्वपूर्ण फायली गायब केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दोषींनी आठ दिवसांमध्ये फायली जमा न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत.
शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांनी मनपाकडून बांधकाम परवानगी घेताना पार्किंगसाठी ऐसपैस जागा दाखविलेली असते. प्रत्यक्षात बांधकाम झाल्यावर पार्किंगच्या जागेवर दुकाने, फ्लॅट, गोदामाचे बांधकाम करण्यात येते. बांधकाम व्यावसायिकांनी पार्किंगची सोय न केल्याने सर्वसामान्य नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो.
शनिवारी मनपा आयुक्त बकोरिया यांनी नगररचना विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीत नव्यानेच बदलून आलेल्या काही कनिष्ठ अभियंत्यांना पार्किंगच्या फायलींबद्दल विचारणा करण्यात आली. सर्वांनी आम्हाला चार्ज देताना फायली मिळाल्याच नाहीत, असे सांगितले. कर्मचाऱ्यांचे हे उत्तर ऐकून आयुक्तही क्षणभर अवाक झाले. आठ दिवसांमध्ये गहाळ झालेल्या फायली शोधून काढा. फायली उपलब्ध न करून दिल्यास फौजदारी कारवाई करा, असे आदेश आयुक्तांनी दिले.