जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर काळी-पिवळी वाहनांची पार्किंग
By Admin | Updated: January 23, 2015 00:55 IST2015-01-23T00:30:32+5:302015-01-23T00:55:36+5:30
लातूर : शहरात येण्यास मज्जाव करुन लातूर शहराबाहेर थांबा दिल्याने काळी पिवळीच्या चालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर काळी-पिवळी वाहनांची पार्किंग
लातूर : शहरात येण्यास मज्जाव करुन लातूर शहराबाहेर थांबा दिल्याने काळी पिवळीच्या चालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. पोलिसांच्या या कारवाईविरुध्द मराठवाडा टॅक्सी चालक संघटनेच्या वतीने आपली काळी-पिवळी वाहने जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरच्या मैदानात लावल्या तर कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यांच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोरील मैदान काळी - पिवळीच्या थांब्यासारखे भरुन गेले होते.
आजूबाजूच्या गावांमधून प्रवासी घेऊन येणाऱ्या दीडशे ते दोनशे काळी-पिवळी वाहने आहेत. या वाहनांना गेल्या काही दिवसांपासून पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी शहराबाहेर थांबा करण्याचे आदेश देत कारवाई केली. त्यामुळे या वाहनांना शहरात येण्यास बंदी आहे. आल्यास पोलिस तत्काळ कारवाई करतात. या कारवाईच्या विरोधात काळी पिवळी चालकांनी गुरुवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यांनी थेट आपली वाहने जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या दारासमोरच्या मैदानात आणून उभी केली तर कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरासमोर थांबलेली दीडशेहून अधिक काळी - पिवळी वाहने चांगलेच लक्ष वेधून घेत होती. अनेकांना ही वाहने इथे कशी काय लावली याचा पत्ताच लागला नाही. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात टॅक्सी मालक आणि चालकांवरील अन्याय दूर करावा, शहरात थांबे द्यावेत, ५ + १ आणि ९ + १ ला मीटर बसविण्यात यावे, प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)