पालक सचिवांनी दुष्काळी स्थितीचा घेतला आढावा
By Admin | Updated: November 18, 2014 01:06 IST2014-11-18T00:35:49+5:302014-11-18T01:06:33+5:30
जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी तसेच चारा टंचाईसंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत

पालक सचिवांनी दुष्काळी स्थितीचा घेतला आढावा
जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी तसेच चारा टंचाईसंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालक सचिव राजेशकुमार म्हणाले की, नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून घ्याव्यात. नागरिकांना मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. जलस्त्रोताची तपासणी करून नादुरूस्त असलेले हातपंपही दुरूस्त करून घेण्याबरोबरच उपलब्ध असलेला जलसाठा पिण्यासाठी राखून ठेवण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत विविध शासकीय कार्यालयांमार्फत पाणीपुरवठ्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यावेळी सादर करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, जिल्हा कोषागार अधिकारी कल्याण औताडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) पदमाकर केंद्रे, डीआरडीचे प्रकल्प संचालक नितीन थाडे आदींची उपस्थिती होती.
प्रधान सचिव राजेशकुमार यांनी पीरकल्याण येथील मध्यम प्रकल्पास भेट देऊन उपलब्ध पाण्याची पाहणी केली. उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी प्रकल्पातील पाणी उपसा झाल्यानंतर गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येणार असून प्रकल्प क्षेत्रात जनावरांच्या चाऱ्यासाठी लागवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.