परभणीकरांना पर्यटनाची नेहमीच ओढ
By Admin | Updated: September 28, 2014 00:13 IST2014-09-28T00:11:10+5:302014-09-28T00:13:25+5:30
परभणी : चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळलेल्या परभणीकरांचा पर्यटनासाठी देशात व विदेशात चांगलाच ओढा असल्याचे दिसून येत आहे़

परभणीकरांना पर्यटनाची नेहमीच ओढ
परभणी : चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळलेल्या परभणीकरांचा पर्यटनासाठी देशात व विदेशात चांगलाच ओढा असल्याचे दिसून येत आहे़ निसर्गरम्य ठिकाणी जात असतानाच धार्मिक व ऐतिहासिक स्थळी जाताना परभणीकर दिसत आहेत़
२७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला़ यानिमित्त आढावा घेतला असता जिल्ह्यातील नागरिक देशात व विदेशात विविध ठिकाणी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात जात असल्याचे दिसून आले़ पर्यटनासाठी भटकंती करणाऱ्यांचे उद्देश आणि हेतु वेगवेगळे असतात़ चाकोरीबद्ध जीवनाला कंटाळलेल्यांना एक आवश्यक बदल, विश्रांती, निवांतपणाची आवश्यकता असते़ तर काहींना निसर्गाची ओढ असते़ काही जणांना ऐतिहासिक, धार्मिक स्थळी जाण्यास स्वारस्य असते़ कारणे वेगवेगळी असली तरी आपली नियोजित पर्यटन यात्रा सुखद, संस्मरणीय व विनासायास होण्यासाठी परभणीकर अनेकदा पैसा, वेळ, श्रम खर्ची घालतात़ यासंदर्भात माहिती देताना परभणी येथील केसरी टुर्सचे एजंट नंदू तापडिया म्हणाले की, केसरी टुर्सच्या माध्यमातून दरवर्षी परभणीतून देशभरात जवळपास ५०० नागरिक पर्यटनासाठी जातात़ तर साधारणत: २५० ते ३०० नागरिक विदेशात पर्यटनासाठी जातात़ मराठवाड्यात सर्वाधिक संख्येने पर्यटनासाठी जाणारे नागरिक परभणीतील आहेत़ देशांतर्गत ठिकाणांमध्ये केरळ, काश्मीर या ठिकाणांना अधिक पर्यटक भेटी देतात़ तर तिरुपती व दक्षिण भारतात धार्मिक स्थळांना जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे़ गट करून पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या परभणीत अधिक आहे़ खाजगी एजन्सीव्यतिरिक्त स्वत: फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे तापडिया म्हणाले़ पर्यटनासाठी जाणारे पर्यटक जवळपास सहा महिने अगोदरपासूनच बुकींग करतात़ देशात पर्यटनासाठी जाण्यासाठी कमीत कमी १८ हजार रुपये एका व्यक्तीला लागतात, असे तापडिया म्हणाले़ सेवेचा दर्जा व येण्या-जाण्याचे माध्यम यावरून खाजगी कंपन्यांकडून पर्यटनाचे पॅकेज ठरविले जाते़ पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने आता या व्यवसायाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळू लागला आहे़ शिवाय रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात या व्यवसायात निर्माण झाल्या आहेत़ (प्रतिनिधी)