परभणीला स्वतंत्र विद्यापीठ व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:43 IST2017-09-05T00:43:21+5:302017-09-05T00:43:21+5:30
परभणी येथे शैक्षणिक हब निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, त्यातूनच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र परभणीसाठी मंजूर करून घेतले़ एवढ्यावरच थांबणार नसून, परभणीला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करून शैक्षणिक क्षेत्रात परभणीचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सांगितले़

परभणीला स्वतंत्र विद्यापीठ व्हावे
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी येथे शैक्षणिक हब निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, त्यातूनच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र परभणीसाठी मंजूर करून घेतले़ एवढ्यावरच थांबणार नसून, परभणीला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करून शैक्षणिक क्षेत्रात परभणीचे नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सांगितले़
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या जुन्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या इमारतीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात अले आहे़ या उपकेंद्राचे उद्घाटन ४ सप्टेंबर रोजी पार पडले़ या प्रसंगी आ़ डॉ़ राहुल पाटील बोलत होते़ अध्यक्षस्थानी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ पंडीत विद्यासागर, प्रक़ुलगुरु गणेशचंद्र शिंदे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू, आ़ डॉ़ राहुल पाटील, अॅड़ अशोक सोनी, कुलसचिव डॉ़ रमजान मुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती़
आ़ डॉ़ पाटील म्हणाले, जिल्हानिहाय विद्यापीठांची निर्मिती झाली तर शैक्षणिक विकास शक्य आहे़ परभणी जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक ओढाताण थांबविण्यासाठी परभणी येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे आहे़ त्यासाठी पहिले पाऊल म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र परभणीला मंजूर करून घेतले़ परभणी जिल्ह्यात मोठे टॅलेंट आहे़ त्यामुळे चांगल्या भौतिक सुविधा विकसित करून हे उपकेंद्र नावलौकिकास पात्र होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत परभणीतील विद्यापीठासाठी जमिनीचा प्रश्न सोडवून एका वर्षात भूमीपूजन करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला़ अध्यक्षीय समारोपात कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर म्हणाले, आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे परभणीत हे उपकेंद्र सुरू झाले आहे़ परभणी येथे विद्यापीठ स्थापन करण्याचा त्यांचा मानस असून, उपकेंद्र म्हणजे त्यांच्या ध्येयाच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे मत व्यक्त केले़ या उपकेंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, सुविधा देण्याचा प्रयत्न विद्यापीठ करेल, असे त्यांनी सांगितले़ यावेळी कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू, गणेशचंद्र शिंदे यांचीही भाषणे झाली़ यावेळी अॅड़ अशोक सोनी, माजी अधिसभा सदस्य चौधरी, चांडक, डॉ़ व्ही़एम़ मोरे, डॉ़ बी़एम़ भोसले, प्राचार्या संध्याताई दुधगावकर, प्राचार्य चेंदूरवार, प्राचार्य डॉ़ बाळासाहेब जाधव, वामनराव जाधव, शिक्षण संचालक डॉ़ व्ही़डी़ पाटील, प्राचार्य गोखले, डॉ़ दिलीप मोरे, कृषी विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता कुडाळ यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले़ कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़