मुस्लिम बांधवांचा परभणीत मोर्चा
By Admin | Updated: December 18, 2015 23:31 IST2015-12-18T23:25:46+5:302015-12-18T23:31:34+5:30
परभणी :शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

मुस्लिम बांधवांचा परभणीत मोर्चा
परभणी : हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन त्यांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ १८ डिसेंबर रोजी परभणीत मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजता शहरातील अपना कॉर्नर भागातून मोर्चाला सुरुवात झाली.सदर मोर्चा ग्रॅन्ड कॉर्नर, जिल्हा क्रीडा संकुलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. येथे विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यामध्ये कमलेश तिवारी यांच्या वक्तव्याने मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
मुफ्ती निजामोद्दीन, मौलाना रफियोद्दीन अशरफी, मौलाना सरफराज, सय्यद अब्दुल खादर, महमद अल्ताफ मेमन, जाकीर कुरेशी, अली खान, मुज्जमील खान, अॅड. शोएब, अॅड. जावेद कादर, काजी उबेद शालीमार, प्रो. वसीम, हफीज चाऊस, माजू लाला, रशीद इंजिनिअर, शेख मुज्जमील, विजय वाकोेडे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, मोर्चानंतर शांततेच्या मार्गाने मोर्चेकरी परतले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधीक्षक नियती ठाकर स्वत: दुपारी १ वाजेपासून बंदोबस्तासाठी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)