परळीत मान्सूनपूर्व कामांचा उडाला फज्जा
By Admin | Updated: June 23, 2014 00:20 IST2014-06-22T22:53:46+5:302014-06-23T00:20:51+5:30
परळी: शहरातील पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचे काम झाले नसल्याने जोरात पाऊस सुरु झाल्यास नाल्यातील पाणी रस्त्यावर साचून नागरिकांची अडचण होण्याची शक्यता आहे.

परळीत मान्सूनपूर्व कामांचा उडाला फज्जा
परळी: शहरातील पावसाळ्यापूर्वीच नालेसफाईचे काम झाले नसल्याने जोरात पाऊस सुरु झाल्यास नाल्यातील पाणी रस्त्यावर साचून नागरिकांची अडचण होण्याची शक्यता आहे. न.प.च्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत मान्सूनपूर्व कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. याचा त्रास परळी शहरवासियांना सहन करावा लागत आहे. न. प. च्या विरोधात परळीकर संताप व्यक्त करत आहेत.
नेहरु चौकातील नाल्यांची साफसफाई झालेली नाही. तुंबलेल्या नाल्याही मोकळ्या करण्यात आलेल्या नाहीत. या नालीत डुकरांचे वास्तव्य नेहमीच असते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असून त्यांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे. नगरपालिकेचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
शहरातील नेहरु चौक, बसवेश्वर कॉलनी, गंगासागर नगर या भागात नाल्यांची सफाई झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाल्यांचे पाणी घरात घुसून परिसरातील नागरिकांचे साहित्याचे नुकसान होत आहे. बसवेश्वर कॉलनीतून नवगण कॉलेज कमानीमार्गे लिटल फ्लॉवर स्कूल, बाजीप्रभू नगर या मार्गावरील नाल्याची स्वच्छता अद्याप केलेली नाही. या नाल्यांमध्ये डुकरांचा मुक्त संचार चालू असतो. तब्बल दोन महिन्यांपासून या नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या दुर्गंधीमुळे डासांचा उपद्रव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बसवेश्वर कॉलनी पूल ते स्टेशन रोड पूल या ठिकाणी मातीचे ढिगारे साचले आहे. एका रांगेत साचलेले ढिगारे कोणी टाकले व का उचलले नाहीत असा सवाल शिवसेनेचे शहर उपप्रमुख वैजनाथ माने, किशन परांडे, नागेश माळी यांनी केला आहे. हे संबंधितांनी तरी उचलावेत, तरच पावसाचे पाणी व्यवस्थितरीत्या नाल्यातून जाईल.
मातीच्या ढिगाऱ्यामुळे पोलिस क्वॉर्टरच्या पाठीमागे पावसाचे पाणी साचत आहे. याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहराच्या माणिकनगर, नाथ रोड, गुरुकृपानगर, हमालवाडी या भागातील नाल्यांची स्वच्छता केलेली नाही. शहरातील अनेक मुख्य भागातील नाल्यासह रस्त्यांची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. शहरातील सर्व ठिकाणची कामे येत्या दोन दिवसात करण्यात येतील, असे नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांनी सांगितले.
याबाबत मुख्याधिकारी यांनी नाल्यावरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचनाही याअगोदर दिल्या होत्या. मात्र याचा अद्यापही परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे. न.प. कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील स्वच्छता करण्यात येत असल्याचा दावाही न.प.ने केला आहे. दोन दिवसात शहरातील सफाई करण्यात येईल, असा शब्द न.प.ने दिल्यानंतर खरोखरच ही सफाई होईल काय, न.प. दिलेला शब्द पूर्ण करेल का हे पाहण्यासाठी परळीकर उत्सुक झाले आहेत. (वार्ताहर)
धनंजय मुंडेंनी घेतली बैठक
स्वच्छतेच्या संदर्भात आ. धनंजय मुंडे यांनी बैठक घेतली. बैठकीत नगराध्यक्ष दीपक देशमुख, मुख्याधिकारी संभाजी वाघमारे, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे, स्वच्छता निरीक्षक श्रावणकुमार घाटे यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होती. ज्या त्या विभागातील कर्मचारी तेथेच वापरावेत अशा सूचनाही यावेळी मुंडे यांनी दिल्या. येत्या तीन दिवसात परळी शहर स्वच्छ दिसेल असे अश्वासनही त्यांनी दिले.