संभ्रमात अडकली ‘जन-धन’ !

By Admin | Updated: September 19, 2014 01:00 IST2014-09-19T00:51:36+5:302014-09-19T01:00:51+5:30

हरी मोकाशे ,लातूर केंद्र शासनाने नव्याने सुरु केलेल्या जन- धन योजनेसंदर्भात अद्यापही ग्रामीण भागात संभ्रम आहे़ अशातच अफवांचे पीक वाढले आहे़ परिणामी,

Paranoid stuck 'Jan-Dhan'! | संभ्रमात अडकली ‘जन-धन’ !

संभ्रमात अडकली ‘जन-धन’ !



हरी मोकाशे ,लातूर
केंद्र शासनाने नव्याने सुरु केलेल्या जन- धन योजनेसंदर्भात अद्यापही ग्रामीण भागात संभ्रम आहे़ अशातच अफवांचे पीक वाढले आहे़ परिणामी, नव्याने खाते काढण्यासाठी बँकासमोर गर्दी वाढलेली पहावयास मिळत आहे़ त्याचा परिणाम बँकेच्या उलाढालीवरही काही प्रमाणात झालेला असून जिल्ह्यात दररोजच्या उलाढालीत १० कोटी रुपयांपर्यंत घट झाली असल्याचे दिसून येते़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यापासून देशात जन- धन योजना सुरु केली आहे़ या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते पाहिजे़ वास्तविक पहाता देशातील प्रत्येक व्यक्ती हा बँकेच्या परिघात यावा म्हणून ही योजना लागू केली आहे़ सध्या प्रत्येक योजनांचा लाभ, कुठलेही अनुदान हे रोख स्वरुपात देणे बंद करण्यात आले असून ते बँकेद्वारे देण्यात येत आहे़ परंतु, ग्रामीण भागातील अनेक नागरिक बँकेपासून दूर असल्याने त्यांना बँक व्यवहारात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे़
सन २०१८ पर्यंत देशातील प्रत्येकाचे बँकेत खाते असावे म्हणून जोरदार प्रयत्न सुरु आहेत़ या जन- धन योजनेतंर्गत खातेदाराच्या आकस्मित मृत्यूमुळे त्याचा परिवारास १ लाख रुपयांचा विमा देण्यात येणार असल्याचे बँकेस शासनाने कळविले आहे़ त्याचबरोबर खात्यावर जमा असलेल्या रकमेवर व्याज, कुठलीही अनामत ठेव न घेता शून्य पैशावर खाते उघडणे, ५ हजार रुपयांपर्यंत कर्ज, घर खरेदी अथवा निर्मितीसाठी कर्ज, शिक्षण, कृषी अथवा कृषीविषयाशी निगडित उद्योग उभारणीसाठी कर्ज व ओव्हरड्राफ्ट अशा सुविधा देण्यात येणार आहेत़
या सेवांव्यतिरिक्त कुठलाही लाभ देण्यात येणार नाही़ परंतु, ग्रामीण भागात नागरिकांत वर्षाला या बँकेखात्यावर ३० हजार रुपये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले जन-धनचे कार्ड अन्य काही अनुदान देण्यात येत असल्याची अफवा पसरली आहे़ त्यामुळे बँकेच्या द्वारावर नवीन खाते उघडण्यासाठी गर्दी झालेली आहे़ विशेष म्हणजे ज्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत आहे, असेही नागरिक नव्याने खाते उघडण्यासाठी गर्दी करीत आहेत़ वास्तविक पहाता ज्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत खातेच नाही अशांनीच खाते उघडणे आवश्यक आहे़
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेप्रमाणे जन- धन योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेले कार्ड देण्यात येणार असल्याची गावात अफवा आहे़ त्याचबरोबर बँकेत खाते उघडल्यानंतर वर्षाला किमान दहा हजार रुपये खात्यावर जमा होणार असल्याची अफवा आहे़ नेमके ही योजना काय आहे? याची ग्रामीण भागात माहितीच नाही़ त्यामुळे नव्याने खाते उघडण्यासाठी मीसुध्दा धावपळ केली असल्याचे तालुक्यातील रुई- रामेश्वर येथील नवसागर लांडगे यांनी सांगितले़
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्यास नव्याने खाते उघडण्याची आवश्यकता नाही़ त्यामुळे नागरिकांनी नव्याने खाते उघडू नये़ यासंदर्भात शासनाने परिपत्रक आले आहे, असे बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक उमाकांत चौधरी यांनी सांगितले़
गेल्या महिन्याभरापासून जन- धन योजनेस प्रारंभ झाला आहे़ अवघ्या महिनाभराच्या कालावधीत जिल्ह्णात २३ राष्ट्रीयकृत बँकांमधून ५३ हजार ३०० नागरिकांनी बँक खाते उघडले आहे़ बँक खाते उघडण्यासाठी आधारकार्ड आणि दोन छायाचित्रांची आवश्यकता असल्याचे राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़
जिल्ह्यातील लातूर शहर आणि उदगीर या ठिकाणी मोठ्या बाजारपेठा आहेत़ त्यामुळे दररोजची बँकेतील उलाढाल ही जवळपास २०० कोटी रुपयांची आहे़ बँकेत गर्दी असल्याने अनेकजण आजचा व्यवहार दुसऱ्या दिवसावर ढकलत असल्याने दररोज किमान १० कोटी रुपयांची उलाढाल कमी झाली असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़
या योजनेमुळे प्रत्येकजण बँक व्यवहाराच्या कक्षेत येत असल्याने योजनेचे स्वागत करीत असून, २ आॅक्टोबरला खाते उघडण्यासाठी मोहीम राबविणार असल्याचे बँक आॅफ महाराष्ट्र एम्प्लॉईज विभाग संघटन सचिव उत्तम होळीकर यांनी सांगितले़

Web Title: Paranoid stuck 'Jan-Dhan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.