प्रशासनाची समांतर यंत्रणा
By Admin | Updated: September 13, 2014 23:05 IST2014-09-13T22:50:54+5:302014-09-13T23:05:15+5:30
परभणी : उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी समांतर यंत्रणा कार्यरत केली जाणार असल्याची माहिती सुभाष शिंदे यांनी दिली.

प्रशासनाची समांतर यंत्रणा
परभणी : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, आचारसंहितेच्या काळात उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी समांतर यंत्रणा कार्यरत केली जाणार असल्याची माहिती परभणी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिंदे यांनी दिली.
परभणी विधानसभा निवडणुकीतील प्रशासकीय तयारीच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी शिंदे यांनी पत्रपरिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी मतदारसंघात पाच पथके स्थापन केली आहेत. दिवस-रात्र ही पथके कार्यरत राहणार आहेत. या मतदारसंघात आचारसंहितेच्या काळात नाकेबंदी करण्यासाठी देखील तीन पथके कार्यान्वित केले आहेत. या काळात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांचे चित्रीकरण करण्यासाठी एक पथक कार्यरत केले असून, तसेच केलेल्या चित्रीकरणाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी आणखी एक पथक स्थापन केले आहे.
उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रस्तरावरुन निरीक्षक येतात. यावेळेस स्थानिक पातळीवर देखील सहायक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. कार्यकारी दंडाधिकारी दर्जाचा अधिकाऱ्यांची सहायक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष असेल. या केंद्रांवर दिवसभर चित्रीकरण केले जाईल. तसेच एका सुक्ष्म निरीक्षकाची देखील या ठिकाणी नियुक्ती होणार आहे. उमेदवारांच्या खर्चावरील नियंत्रणासाठी यावेळेस प्रशासनाची देखील समांतर यंत्रणा राहील, अशी माहिती सुभाष शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)