‘समांतर’ रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत !
By Admin | Updated: September 18, 2014 00:40 IST2014-09-18T00:38:08+5:302014-09-18T00:40:33+5:30
आशपाक पठाण , लातूर मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गांधी चौक ते पीव्हीआर चौक रेल्वे रुळावर मुख्य मार्गाला समांतर रस्ता तयार करण्यात आला आहे.

‘समांतर’ रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत !
आशपाक पठाण , लातूर
मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गांधी चौक ते पीव्हीआर चौक रेल्वे रुळावर मुख्य मार्गाला समांतर रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर असलेली सद्य:स्थितीतील अतिक्रमणे ही वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वाहनधारकांना अडथळ्यांतून मार्ग काढावा लागतो. मनपा प्रशासनाने रस्त्याचे चौपदरीकरण व इतर कामांसाठी नुकताच सव्वा तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कामाला सुरुवात झाली असली, तरी रस्त्यावर असलेले अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होणार आहे.
लातूर शहरातील जुन्या रेल्वे रुळावरील हा समांतर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय बनला आहे. रेल्वे रुळाची जागा हस्तांतरीत करून घेण्यात आली. त्यानंतर या रुळावर रस्ताही तयार करण्यात आला. परंतु, काही ठिकाणी राहिलेल्या अर्धवट कामांमुळे पूर्णपणे या मार्गावर वाहतूक सुरू झालेली नाही. काही दिवस मुख्य मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्यावर वळविण्याचा प्रयत्न झाला. मात्र या मार्गावर असलेले अडथळे वाहनधारकांना गैरसोयीचे ठरत आहेत. मिनी मार्केट ते शिवाजी चौक या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा ट्रॅव्हल्सच्या रांगा लागलेल्या असतात. रात्रीच्या वेळी समांतर रस्ता हा खाजगी ट्रॅव्हल्सचा थांबा बनला आहे. समांतर रस्त्यावर तयार करण्यात आलेल्या डिव्हायडरमुळे रस्ता अपुरा पडत असल्याने महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नव्याने डिव्हायडर तयार करणे व रस्त्याच्या चौपदरीकरण कामासाठी ३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या कामासाठी निविदा मागवून घाई घाईत स्थायी समितीने निविदेला मंजुरी देत वर्कआॅर्डर काढण्याची प्रक्रिया केली. समांतर रस्त्यावर बार्शी रोडकडे जाणाऱ्या वाहनधारकांची सोय होईल. मुख्य मार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होईल, यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला अडथळे हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
पार्किंगने व्यापला रस्ता...
शिवाजी चौकातून पुढे दयानंद गेट व पाण्याच्या टाकीपर्यंतच्या समांतर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. दयानंद गेटवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळीपिवळी वाहनधारकांना थांबा देण्यात आला आहे.
शिवाय, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या वाहनांची पार्किंग अर्धा रस्ता व्यापून घेते. त्यात पुन्हा हातगाड्यांची भर आहे. त्यामुळे रस्ता मोठा असला, तरी वाहतुकीसाठी मात्र अत्यंत अरुंद असल्याने या मार्गाचा वापर जवळपास पाच ते दहा टक्के वाहनधारक करतात. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील समांतर रस्त्याचा ‘वाद’ आहे. त्यामुळे एका बाजूचे काम रखडले आहे. त्यामुळे रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनधारकांनी रस्त्यावरच वाहनतळ केले आहे.
दयानंद गेट ते पाण्याची टाकी या भागातील समांतर रस्त्यावर शेकडो भाजीपाला विक्रेत्यांनी ठिय्या मांडला आहे. ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना सदरची जागा मोक्याची ठरली. दहा वर्षांत जवळपास शंभरपटीने विक्रेत्यांची संख्या वाढली. त्यामुळे जवळपास दोन किलोमीटरचा रस्ता भाजीपाला विक्रेत्यांनीच ताब्यात घेतला आहे. अनेक विक्रेत्यांनी पेण्डॉल टाकले आहेत. शेतकऱ्यांचे नाव असलेल्या या बाजारात व्यावसायिकांचीच चलती आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना जागेसाठी व्यावसायिकांना विनवणी करावी लागते.
४भाजीपाला विक्रेत्यांनी शिस्त सोडल्याने वाहनधारकांची गैरसोय होते. शिवाय, शेतकऱ्यांना या बाजारात जागाही मिळत नाही. ठराविक विक्रेत्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे.
महानगरपालिकेने मिनी मार्केट ते पीव्हीआर चौक या रेल्वे रुळावरील समांतर रस्त्याच्या कामासाठी नगरोत्थान व तेराव्या वित्त आयोगातून ३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या कामाची वर्कआॅर्डर देण्यात आली असून, कामाला सुरुवातही झाली आहे.
४सध्या डिव्हायडरचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण होईल. काम सुरू होताच रस्त्यावरील अडथळे दूर होतील, असे मनपाचे नगर अभियंता केंद्रे यांनी सांगितले.