परंड्यात पार्थिव ठेवले रस्त्यावर
By Admin | Updated: January 16, 2015 01:07 IST2015-01-16T01:03:22+5:302015-01-16T01:07:40+5:30
परंडा : अपघातानंतर कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या कात्राबाद ग्रामस्थांनी गुरुवारी

परंड्यात पार्थिव ठेवले रस्त्यावर
परंडा : अपघातानंतर कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या कात्राबाद ग्रामस्थांनी गुरुवारी दुपारी मयताचे पार्थिव पोलीस ठाण्याजवळील चौकातील रस्त्यावर आणून ठेवले़ जवळपास तीन तास हे प्रेत भरचौकात ठेवण्यात आले होते़ यावेळी मयताचे नातेवाईक आणि पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़
मिळालेल्या माहितीनुसार, कात्राबाद येथील धनाजी गैबी शिनगारे व त्यांच्या पत्नी संगिता हे दोघे बार्शी तालुक्यातील मांजरे देवगाव येथे गेले होते़ ते दोघे गुरुवारी सकाळी दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- ए़ए़५०७९) गावाकडे येत होते़ त्यांची दुचाकी बार्शी-परंडा राज्य मार्गावरील आसू फाट्याजवळ आली असता पाठीमागून आलेल्या कारने जोराची धडक दिली़ या अपघातात धनाजी शिनगारे व त्यांच्या पत्नी हे दोघे गंभीर जखमी झाले़ जखमींना उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात नेण्यात आले होते़ मात्र, उपचार सुरू असताना धनाजी यांचा मृत्यू झाला तर संगिता शिनगारे या गंभीर जखमी झाल्या आहेत़
दरम्यान, सकाळी अपघात झालेला असताना सायंकाळपर्यंत परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे मयताच्या नातेवाईकांना समजले़ त्यानंतर मयताचे पार्थिव थेट परंडा पोलीस ठाण्याकडे आणण्यात आले़ पोलिसांनी नातेवाईकांना अडविल्यानंतर ठाण्याच्या शेजारीच असलेल्या शिवाजी चौकातील रस्त्यावर मयताचे पार्थिव ठेवण्यात आले़ संबंधित कारचालक महिलेविरूध्द गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी जवळपास तीन तास ठिय्या मांडला होता़ यावेळी पोलीस आणि नातेवाईकांमध्ये शाब्दीक बाचाबाचीही झाली़ कारचालक महिलेविरूध्द गुन्हा दाखल केल्यानंतर मयताचे पार्थिव अंत्यविधीसाठी नेण्यात आले़ मयत धनाजी शिनगारे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे़