परभणी मतदारसंघात ५ हजार कोटींचे रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:45 IST2017-07-28T23:45:55+5:302017-07-28T23:45:55+5:30
परभणी : केंद्र शासनाने परभणी लोकसभा मतदारसंघात ५ हजार ३०२ कोटी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी दिली असून या रस्त्यांची कामे दोन वर्षात पूर्ण करायची आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे बोलताना दिली.

परभणी मतदारसंघात ५ हजार कोटींचे रस्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाने परभणी लोकसभा मतदारसंघात ५ हजार ३०२ कोटी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी दिली असून या रस्त्यांची कामे दोन वर्षात पूर्ण करायची आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे संपर्कमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे बोलताना दिली.
परभणी येथील महात्मा फुले विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लोणीकर म्हणाले की, परभणी लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन नव्याने रस्ते तयार करण्यासाठी निधीची आपण केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर गडकरी यांनी मतदारसंघासाठी तब्बल ५ हजार ३०२ कोटी रुपये मंजूर केले असून परभणीच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम विकासकामांसाठी उपलब्ध झाली आहे. या रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून या कामाचे भूमिपूजन २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता परतूर तालुक्यातील वाटूरफाटा येथे नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या दोन वर्षात या रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये जालना-वाटूरफाटा-जिंतूर-बोरी-झरी- परभणी या रस्त्याच्या कामाचा समावेश असून यासाठी ८५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाला जोडणारा असल्यामुळे परभणीपासून मुंबईचे अंतर केवळ ६ तासांचे राहणार आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकºयांचा शेतमाल थेट मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचवता येणार आहे. शिवाय या भागातील उद्योगधंद्यांनाही यामुळे चालना मिळणार आहे.